मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून कधी आंदोलन तर कधी उपोषणाचा मार्ग स्वीकारणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रविवारी आंतरवली सराटीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला होता. त्यापाठोपाठ त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. मात्र, प्रकृती बिघडल्यामुळे ते आंतरवली सराटीमध्ये परतले. आज दुपारी त्यांनी बेमुदत उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीसांवर केले होते गंभीर आरोप!

मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने मंजूर केला. मात्र, ओबीसी कोट्यातूनच मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं, स्वतंत्र आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. तसेच, सगेसोयरेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अधिसूचनेचं पालन केलं जावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र, सरकारमधील सगळे निर्णय देवेंद्र फडणवीसच घेत असून यामागेही त्यांचाच हात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

“मनोज जरांगे आधी बाण सोडतो आणि मग…”, अजय बारसकरांची पुन्हा टीका; म्हणाले, “कालचा तमाशा…”

दरम्यान, रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर उपोषण करण्याचा निर्धार बोलून दाखवला व ते मुंबईच्या दिशेनं निघाले. मात्र, वाटेत त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते आंतरवली सराटीमध्ये परतले. तिथे त्यांनी उपचार घेतले. त्यानंतर आंदोलन स्थगित करत असून इथून पुढे साखळी उपोषण होईल, असं त्यांनी जाहीर केलं आहे.

बेमुदत उपोषणाचं साखळी उपोषणात रुपांतर

“मी आजपर्यंत तगडी उपोषणं केली. या उपोषणाचा हा १७वा दिवस आहे. आता हे उपोषण स्थगित करतोय. याचं रुपांतर आता साखळी उपोषणात केलं आहे. रोज चार मुलं इथे उपोषणाला बसणार आहेत. राज्यभरातही मी आवाहन करतो की शांततेत सगळी साखळी उपोषणं करावी. मी केलेल्या तिन्ही उपोषणांमध्ये मी मराठा समाजाला न्याय मिळवून दिला आहे. एकही उपोषण वाया जाऊ दिलेलं नाही”, असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं.

पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल!

“मी हटणार नाही. देवेंद्र फडणवीसची ही जबाबदारी होती. ती मी पार पाडली. रात्री इथे ५ हजार महिला होत्या आणि २५ हजार लोक होते. रात्रीत देवेंद्र फडणवीसला काहीतरी घडवून आणायचं होतं. लोक सैरावैरा पळाले असते रानात. देवेंद्र फडणवीसला दुसऱ्यांदा आंतरवाली सराटी घडवायची होती. मी ते वाचवलं. जर इथे लाठीचार झाला असता, तर सगळा मराठा पेटून उठला असता. राज्य बेचिराख होण्यापासून मी वाचवलं आहे. पहिला हल्ला देवेंद्र फडणवीसनीच केला होता”, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.