Manoj Jarange On Maratha Reservation : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चांगलांच तापलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषणही केलं. मात्र, त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला. तसेच याबाबत सर्वपक्षीय बैठकही बोलावण्यात आली होती. मात्र, त्यामध्येही काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
अशातच आज मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाला संबोधित करत असताना मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, “मी तुमच्यासाठी खंबीर आहे. माझी समाजाकडे काहीही अपेक्षा नाही. तुमचे पोरं मोठे करण्यासाठी मी जीव हातावर घेतला आहे. मी शेवटच्या घटकेपर्यंत मराठा समाजाला कधीही सोडणार नाही”, असं म्हणत मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले होते.
मनोज जरांगे काय म्हणाले?
“कोणताही पक्ष आणि तुमचा नेता मराठ्यांच्या जातीला आणि तुमच्या मुलांना कधीच मोठं करणार नाही. मी तुम्हाला हे तळतळून सांगतो. तुम्ही फक्त जातीला बाप माना, नेत्यांना बाप मानायचं बंद करा. तुमचे मुलं तुम्हाला आयपीएस आणि आयएएस दर्जाचे अधिकारी पाहायचे असतील तर स्वत:चे मुलं मोठे करण्यासाठी लढायला लागा. त्यानंतर जगाच्या पाठीवर सर्वात श्रीमंत आणि प्रगतशील जात म्हणून फक्त मराठ्यांची जात असेल”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
“मी खंबीर आणि कणखर आहे. मी मागे हटत नाही. तुम्ही काळजी करु नका. मला फक्त उपोषणाच्या आणि शरीराच्या वेदना आहेत. बाकीच्या वेदनांना मी खंबीर आहे. माझी समाजाकडून काहीही अपेक्षा नाही. मला समाजाचा एक रुपयाही नको. फक्त समाजाचे पोरं मोठे करण्यासाठी मी जीव तळ हातावर घेतलेला आहे. संपूर्ण सरकार माझ्या मागे लागलंय. विरोधी पक्ष माझ्या मागे लागला आहे. पण मी मागे हटत नाही आणि हटणारही नाही”, असं म्हणत मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला भावनिक आवाहन केलं.
जरांगे पुढे म्हणाले, “मी शेवटचं समाजाला सांगतो की, माझ्यावर सरकारने कधी हल्ला केला तर, कारण मी कुठेही फिरत असतो. मी आजच पुण्याला जाणार आहे. कुठेही जिवघेणा हल्ला केला आणि मी रक्ताच्या थारोळ्यात पडलो तरी मरताना माझ्या तोंडात शब्द फक्त मराठा आणि मराठा आरक्षण हेच असतील. मी शेवटच्या घटका मोजेल पण मी कधीही मराठा समाजाला सोडणार नाही. मला खूप वेदना होयला लागल्या तरीही मी समाजाला सोडून देतो, असं म्हणणार नाही. मराठा समाजाची शान मी कधीही कमी होऊ देणार नाही”, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं.