Maratha Aarakshan Morcha Mumbai Today : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा मोर्चा आज (२६ जानेवारी) मुंबईत दाखल होत आहे. मनोज जरांगे हे त्यांचे समर्थक आणि लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत. मराठा समुदाय सध्या वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये जमला आहे. काही वेळात वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभा होईल. या सभेनंतर मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करतील. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाशी संबंधित बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील. मुंबईकरांची आणि मराठा समाज आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी चर्चेसाठी यावे. आरक्षणाची मागणी मान्य करावी. आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही मात्र, आझाद मैदानावरच उपोषण करणार, असा निर्धार मनोज जरांगे पाटील व्यक्त केला आहे.

Live Updates

मराठा आंदोलनाविषयीच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

15:50 (IST) 26 Jan 2024
मराठा आंदोलकांच्या किती आणि कोणत्या मागण्या मान्य झाल्या? मनोज जरांगेंनी वाचली यादी

१. मराठा समाजातील ५४ लाख लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना जातप्रमाणपत्रांचं वाटप करा, नोंद नेमकी कोणाची हे माहिती करायचं असलं तर ग्रामपंचायतीला नोंदी मिळालेले कागद बाहेरच्या भिंतीवर चिकटवण्यास सांगा. त्यानंतर लोक प्रमाणपत्रं घेण्यासाठी अर्ज करू शकतील. नोंदी मिळाल्या आहेत त्या सर्व कुटुंबांना नोंदींच्या आधारावर प्रमाणपत्र दिलं जावं. ५४ लाख नोंदींनुसार वंशावळी जुळल्यावर त्यांना प्रमाणपत्र मिळायला हवं. ज्याची नोंद मिळाली आहे त्यांनी तातडीने अर्ज भरण्यास सुरुवात करावी. त्यानुसार राज्य सरकारकडे चार दिवसांत प्रमाणपत्र वितरित करण्याची मागणी केली होती. त्यावर राज्य सरकारने म्हटलं आहे की, आतापर्यंत ३७ लाख लोकांना प्रमाणपत्रं दिली आहेत. तसेच वंशावळी जुळवण्यासाठी समिती नेमली आहे.

२. ज्या ३७ लाख लोकांना प्रमाणपत्रं दिली आहेत त्यांची माहिती आम्हाला (मराठा आंदोलक) द्यावी, काही दिवसांत हा डेटा आपल्याला मिळेल.

३. शिंदे समिती रद्द करायची नाही, या समितीने मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधत राहावं. त्यानुसार सरकारने दोन महिने मुदत वाढवली आहे. आंदोलकांनी मागणी केली आहे की, ही समिती एक वर्षभर असायला हवी. त्यावर राज्य सरकारने म्हटलं आहे की, टप्प्याटप्प्याने या समितीची मुदत वाढवू.

४. ज्यांची नोंद मिळाली त्याच्या कटुंबांतील सग्यासोयऱ्यांना प्रमामपत्र दिलं जावं. त्याचा शासननिर्णय/अध्यादेश दिला जावा. जो अद्याप सरकारने काढलेला नाही. ज्याची नोंद आहे ती व्यक्ती त्याच्या सग्यासोयऱ्यांबाबत शपथपत्र सादर करत असेल तर त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं. तसेच हे शपथपत्र मोफत दिलं जावं. यावर सरकारने होकार दिला आहे. सरकारने यासंबंधीचा अद्यादेश जारी करावा.

५. अंतरवालीसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जावे. त्यावर गृहविभागाने म्हटलं आहे की, विहित प्रक्रिया राबवून गुन्हे मागे घेऊ.

६. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव्ह पीटिशन दाखल केली आहे. त्यावर निर्णय होईपर्यंत आणि संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत, मराठा समाजातील मुलांना १०० टक्के शिक्षण मोफत द्यावं, तसेच आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सरकारी भरत्या थांबवा, अथवा आमच्या जागा राखीव ठेवून भरती करा, अशी मागणी केली होती. परंतु, सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही. राज्य सरकाने म्हटलं आहे की, राज्यातील केवळ मुलींना केजी टू पीजीपर्यंतचं शिक्षण देण्याचा निर्णय निर्गमित करू. परंतु, यासाठीचा शासननिर्णय जारी केलेला नाही. राज्य सरकारने केवळ मुलींच्या शिक्षणाबाबत अनुकूलता दाखवली आहे. मुलांच्या मोफत शिक्षणाबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

15:21 (IST) 26 Jan 2024
मराठा आंदोलकांचा चक्का जाम, रस्त्यांवर गाड्यांची रांगच रांग

वाशी शिवाजी चौक ते आरेंजा कॉर्नर तसेच वाशी शिवाजी चौक ते वाशी स्टेशन कडे जाणारा रस्ता वाशी शिवाजी चौक ते वाशी अग्निशमन केंद्र अशा चारही दिशेला सतत वाहतूक कोंडी पहायला मिळते. परंतु आज या ठिकाणी मराठा आंदोलकांचा चक्का जाम झाला असून सर्व रस्त्यांवर मराठा आंदोलक आणि त्यांच्या गाड्यांची रांगच रांग लागली आहे. शिवाजी चौकात सभेच्या ठिकाणी साऊंड सिस्टम बिघाड झाल्यामुळे मिळेल त्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी पदपथावर बसून जरांगे पाटील यांची सभा कधी चालू होणार याच्या प्रतीक्षेत लाखो मराठा बांधव बसले आहेत...

13:18 (IST) 26 Jan 2024
मराठा मोर्चाबाबत फडणवीस-पवार काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रत्येकाला आंदोलन करण्याचे अधिकार आहेत. केवळ हे आदोलन शांततेत व्हावं. उच्च न्यायालयाचे यासंबंधीचे आदेश आहेत. या आदेशाचं आम्ही पालन करू. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करू.

अजित पवार म्हणाले, माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. याप्रश्नी चर्चेतून तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.

13:15 (IST) 26 Jan 2024
राज्य सरकारचा जीआर घेऊन आलेल्या मंगेश चिवटेंना भोवळ

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने जारी केलेली अधिसूचना (जीआर) घेऊन मनोज जरांगे यांना भेटायला वाशी (नवी मुंबई) येथे आलेल्या मंगेश चिवटे यांना भोवळ येऊन ते कोसळले. प्रचंड गर्दी, डोक्यावर आग ओकणारा सूर्य यामुळे चिवटे यांना भोवळ आली. चिवटे यांची प्रकृती आता कशी आहे याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.

12:57 (IST) 26 Jan 2024
मनोज जरागे पाटील तासाभराने सभेला संबोधित करणार

मनोज जरांगे पाटील यांच्या सभास्थळी जमलेल्या सर्वांना ऐकू येईल अशी ध्वनिक्षेपक यंत्रणा उपलब्ध नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी घोषणा केली आहे की, २ वाजता आपण याच ठिकाणी (छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी) भेटू. जरांगे पाटील सरकारने दिलेला जीआर (अधिसूचना) दोन वाजता वाचून दाखवणार.

12:45 (IST) 26 Jan 2024
मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य; दीपक केसरकरांची माहिती

मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती शिक्षणंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. केसरकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील हे समाजाविषयी खूप संवेदनशील आहेत. ते राज्याच्या हिताचा विचार करतील. त्यांच्या मागण्या आता मान्य झाल्या आहेत. त्याची शासकीय अंमलबजावणीदेखील होईल. राज्य सरकारने आतापर्यंत ३७ लाख कुणबी जातप्रमाणपत्रं दिली आहेत. नवीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ५० लाखांहून अधिक प्रमाणपत्रं दिली जातील. पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो.

12:34 (IST) 26 Jan 2024
मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल

मनोज जरांगे पाटील एपीएमसी मार्केटमधून निघून आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी एक अधिसूचना काढली आहे. ही अधिसूचना मनोज जरांगे पाटील आता वाचून दाखवणार आहेत.

मनोज जरांगे आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील चर्चा चर्चा निष्फळ

महाराष्ट्र सरकारच्या दोन शिष्टमंडळांनी लोणावळ्यात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्याने जरांगेंची यात्रा दुपारी ३ वाजता मुंबईच्या दिशेने निघाली. वाशी येथे गुरुवारी रात्री मुक्काम केल्यानंतर शुक्रवारी (२६ जानेवारी) सकाळी त्यांची पदयात्रा मुंबईकडे रवाना झाली आहे. मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावरच आमरण उपोषण करण्यावर जरांगे ठाम आहेत.

“झोपेत असताना पोलिसांनी कागदावर सह्या घेतल्या..”, मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

लोणावळ्यात मी झोपेत असताना कुणीतरी अधिकारी माझ्याकडे आले. त्यांनी कोर्टाचा कागद असल्याचं सांगत माझी सही घेतली. आम्ही कोर्टाचा मान ठेवतो, त्यामुळे मी सही केली. त्यात एक मराठी कागद आणि एक इंग्रजी कागद होता असं आता मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. माझ्यासह इतर नऊ जण असल्याचं सांगत फसवून सही घेण्यात आली. या सहीचा दुरुपयोग कुणी केला तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाण्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलं आहे. आज सकाळी त्यांनी झेंडावंदनही केलं. ज्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही काही वेळात सरकारच्या शिष्ट मंडळांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader