Manoj Jarange Patil Protest Rally in Mumbia: गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेकदा उपोषण केल्यानंतर राज्य सरकारकडूनही मराठा आरक्षण देण्याबाबत जरांगे पाटलांना आश्वासन दिलं आहे. मात्र, राज्य सरकारने दिलेली मुदत न पाळल्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेनं मोर्चा वळवला असून २६ जानेवारी रोजी म्हणजेच शुक्रवारी ते मुंबईत सर्व आंदोलकांसह दाखल होणार आहेत. त्याआधी राज्य सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न चालू असून त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोर्चा लोणावळ्यात…

मनोज जरांगे पाटील सर्व आंदोलकांसह सकाळी लोणावळ्यामध्ये पोहोचले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारकडून दोन शिष्टमंडळं आपल्याशी चर्चा करण्यासाठी आल्याचा उल्लेख केला. “शिष्टमंडळ चर्चेसाठी आलं आहे. पण मी पहाटे सव्वासातला आलोय. त्यामुळे उठायला उशीर झालाय. आधी लोकांशी चर्चा करून नंतर शिष्टमंडळाशी चर्चा करेन”, असं ते म्हणाले.

“शर्यत शेवटच्या टप्प्यात, आरक्षणाची ही शर्यत…”, पहाटे चार वाजता मनोज जरांगे पाटील यांचं भाषण

“एक नवं आणि एक जुनं अशी दोन शिष्टमंडळं आहेत. चर्चा करतो. आमच्या समाजाचं जर त्यात हित असलं, आम्ही म्हणालो तशा मागण्या मान्य असल्या तर बघू, नसल्या तर चलो मु्ंबई. जर-तरला काही अर्थ नाही. सरकारची भूमिका समजल्याखेरीज काही सांगता येणार नाही”, असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. “२६ तारखेला मराठा समाज मुंबईला येणार हे मी आधीच सांगितलं होतं. आम्हाला मागण्या महत्त्वाच्या आहेत. आरक्षण मिळालं तर आम्ही परत जाणारच. मुंबईत काय घर करून राहणार का आम्ही?” असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी यावेळी केला.

“कुणी मोर्चावर दगडफेक केली तर…”

“आपल्या रॅलीत कुणी जाळपोळ किंवा दगडफेक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला पकडायचं, पळवून लावायचं नाही. त्याला बोटही लावायचं नाही त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायचं, तुम्हाला स्वयंसेवक म्हणून हे काम करायचंच आहे. तुम्हाला कुणी त्रास दिला तर तुम्ही त्याला त्रास देऊ नका, त्याला माझ्यापर्यंत आणा मग मी तुम्हाला दाखवतो. मला विचारल्याशिवाय कुणी कुठलीही कृती करु नका”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil maratha reservation rally reach mumbai on 26th jan republic day pmw
Show comments