Manoj Jarange Patil Meets Maulana Sajjad Nomani, Anandraj Ambedkar : मुस्लीम धर्मोपदेशक व बौद्ध धर्मगुरूंनी, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष तथा आंबेडकरी समुदायाचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी आज (३१ ऑक्टोबर) जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी सांगितलं की मराठा, दलित व मुस्लिमांना एकत्र करण्याचं काम ते करणार आहेत. गोरगरिबांसाठीचा लढा आता आपण अधिक तीव्र करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील, मुस्लीम धर्मोपदेशक मौलाना सज्जाद नौमानी व आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मौलाना नौमानी यांनी मनोज जरांगे यांना भारतभर फिरण्याचं आवाहन केलं. मनोज जरांगे यांना हिंदी भाषेत बोलता येत नसल्यामुळे ते महाराष्ट्राबाहेर जाण्याचं टाळतात, हे कळल्यावर नौमानी त्यांना म्हणाले, “अनुवादक म्हणून मी तुमच्याबरोबर देशभर फिरेन”.
नौमानी म्हणाले, “भारताच्या संविधानासारखं संविधान जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात अस्तित्वात नाही. शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित आणि महिलांच्या हक्कांच्या बाबतीत आपलं संविधान सर्वोत्कृष्ट आहे. या संविधानाची निर्मिती करताना आणि देशाची घडी बसवताना महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रातील जनतेने ही गोष्ट गांभीर्याने पाहिली पाहिजे. आपल्या आजवरच्या आदर्श व्यक्तींच्या पावलांवर पाऊल टाकत महाराष्ट्राला व देशाला पुढे नेलं पाहिजे. देशातील अनेक मोठमोठे नेते, ज्यांनी देश घडवला, थोर स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक या महाराष्ट्रातूनच आपल्याला मिळाले. त्यातील काहींशी तुम्ही सहमत असाल अथवा नसाल, तरी देखील या राज्याने देशाला पुढे नेतील असे लोक जन्माला घातले आहेत. ही या भूमीची क्षमता आहे. मनोज जरांगे पाटील हे देखील त्यापैकी एक ताजं उदाहरण आहे”.
हे ही वाचा >> धनंजय मुंडेंच्या शपथपत्रात पाच अपत्यांचा उल्लेख, २०१९ मध्ये तिघांचीच नोंद; पाच वर्षांत संपत्तीही दुप्पट
मौलाना सज्जाद नौमानी काय म्हणाले?
मौलाना सज्जाद नौमानी म्हणाले, “मी उत्तर प्रदेशवरून येथे आलो आहे. मला मराठी बोलता येत नाही त्यामुळे मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मला मराठी नीट बोलता येत नाही आणि मनोज जरांगे यांना हिंदी येत नाही. त्यामुळे मी त्यांना हिंदी शिकवणार आहे. जेणेकरून मनोज जरांगे देशभरातील लोकांना संबोधित करू शकतील. देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकतील. मला मनोज जरांगे यांनी सांगितले की त्यांना हरियाणामधून बोलावणं आलं होतं. परंतु, त्यांना हिंदी येत नाही म्हणून ते तिकडे गेले नाहीत. पण मी त्यांना सांगितलं आहे. तुम्हाला हिंदी येत नाही म्हणून कुठे जाणं टाळू नका. तुम्हाला मान्य असेल तर मी तुमच्याबरोबर देशभर फिरेन. तुमचा अनुवादक म्हणून सर्वत्र यायला तयार आहे. तुमच्यासाठी मी मराठीतून हिंदीत अनुवाद करेन. तुम्ही देशभर फिरा.