मराठा आरक्षणासाठी शनिवारपासून ( २० जानेवारी ) मनोज जरांगे-पाटील यांचे पायी मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे. २६ जानेवारीपासून मुंबईत उपोषण करण्याचा निर्णय जरांगे-पाटलांनी घेतला आहे. आंतरवाली सराटी येथून निघण्याआधी जरांगे-पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे-पाटील यांचा कंठ दाटला, डोळे पाणावले आणि भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

“सामंजस्याची भूमिका होती, म्हणून सरकारला ७ महिन्यांचा वेळ दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा सन्मान केला आहे. कुणबीच्या ५४ लाख नोंदी मिळाल्या असूनही प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी घेत असलेल्या बैठकीत सामील कशाला व्हायचं? शेवटी आम्हाला टोकाचा संघर्ष करावा लागणार आहे,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.

“मुख्यमंत्र्यांना तीनवेळा वेळ वाढवून दिली”

“जाणूनबुजून मराठ्यांच्या लोकांचा वाटोळं करण्याचं सरकारचं स्वप्न दिसत आहे. मुख्यमंत्र्यांना तीनवेळा वेळ वाढवून दिली. सरकारनं ५४ लाख लोकांना कुणबीचं प्रमाणपत्र दिल्यास २ कोटी मराठ्यांच्या मुलांचं कल्याण होईल,” असं जरांगे-पाटील म्हणाले.

“मुंबईला जाण्याची घोषणा केल्यानंतरही सरकार गांभीर्यानं घेत नाही”

“मराठा आरक्षणासाठी ४५ वर्षापासून समाज लढत आहे. करोडोच्या संख्येने मराठा समाज एकत्र आला आहे. २५० हूक अधिक जणांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं आहे. मग, इतकं निर्दयी सरकार असू शकतं का? सरकारला मराठ्यांनी गादीवर बसवलं. ते लोक नोंदी मिळालेल्या असतानाही आरक्षण देऊ शकत नाही? हे दृष्य भयानक आहे. याच्यापेक्षा निर्दयीपणा काय असेल. मराठा समाजावर हजारो गुन्हे दाखल झाले. माता-माऊलींचे डोके फुटले. तरी, आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. मुंबईला जाण्याची घोषणा केल्यानंतरही सरकार गांभीर्यानं घेत नाही. हा खूप अन्यायाचा कळस झाला आहे,” अशी टीका जरांगे-पाटलांनी सरकारवर केली आहे.

“…तर मुंबईकडे जाण्याची वेळ आली नसती”

“मराठा समाजानं शांततेच्या मार्गानं सरकारचं भविष्य कायमचं संपवल्याशिवाय राहायचं नाही. मी लढायला आणि मरायला कधीच भीत नाही. डोळ्यापुढं आत्महत्या झाल्यावर सरकारला झोपही लागली नाही पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं, तर मुंबईकडे जाण्याची वेळ आली नसती. मुंबईत काहीही झालं तरी हरकत नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही,” असा एल्गार जरांगे-पाटलांनी केला आहे.

“मराठ्यांची मुलं संपवण्याचं घाट घातला आहे”

“मी असेन किंवा नसेन, पण मराठ्यांमध्ये फूट पडून द्यायची नाही. छातीवर गोळ्या जरी घातल्या, तरी मागे हटणार नाही. मराठ्यांची मुलं संपवण्याचा घाट घातला जातोय. मराठ्यांची मुलं आत्महत्या करत आहेत. तरीही, सरकार गांभीर्यानं घेत नाही. उपोषणामुळे शरीर साथ देत नाही. पण, लढाई टोकाची आहे. आता आरक्षण घेऊन मुलांच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे,” असं म्हणताना जरांगे-पाटलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.