मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला न जाण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला होता. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आम्हाला विश्वासात घेतलं नसल्याचे कारण त्यांनी दिलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात याची बरीच चर्चाही रंगली होती. दरम्यान, यावरून आता मराठा नेते मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तसेच त्यांनी सत्ताधाऱ्यांनाही लक्ष्य केलं आहे. ते बीडमधील सभेत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?
सत्ताधारी असो किंवा विरोधक, आज आपल्या बाजुने कोणीही नाही. सरकारने विरोधीपक्षाला बैठकीला बोलवलं होतं. मराठा आरक्षणावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यांना या बैठकीला न जाण्यासाठी कोणता रोग झाला होता काय माहिती? माझ्या माहितीनुसार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक आयोजित करण्यात आली होती. अशावेळी महाविकास आघाडीने ओबीसीतून आरक्षण द्या, असे म्हणायला हवं होतं. मात्र, महाविकास आघाडीचे नेते लपून बसले, त्यांना मराठ्यांचं मतदान घेताना गोड वाटलं होतं, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. आरक्षण मिळवण्याची ही चांगली संधी आहे. ही संधी गेली, तर मराठ्यांच्या अनेक पिढ्या बरबाद होतील, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – Manoj Jarange : मनोज जरांगे अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणेंवर संतापले “मराठ्यांची मतं …
सत्ताधाऱ्यांनाही केलं लक्ष्य
पुढे बोलताना त्यांनी सरकारलाही लक्ष्य केलं. विरोधीपक्ष बैठकीला आला नाही तरी काही फरक पडणार नाही. पण सत्ताधाऱ्यांची मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छा शक्ती आहे की नाही? सरकारची इच्छा शक्ती असेल, तर मग विरोधकांची वाट कशाला बघता, सरकारने मराठ्यांना आरक्षण देऊन द्यावं, किती दिवस तुम्ही कारणं सांगणार आहात? विरोधीपक्षा बैठकीला येत नाही, म्हणून तुम्ही मराठ्यांना आरक्षण देणार नाही का? मुळात आरक्षण देण्याचं सरकारच्या मनात नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
माझ्या मते, सत्ताधारी आणि विरोधात एकाच माळेचे मनी आहेत. तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो, अशी यांची प्रवृत्ती आहे. या दोघांनीही मराठ्यांचा जीव घेण्याचं ठरवले आहे. ७० वर्षांपासून आम्ही नेत्यांना मोठं केलं आहे. पण हे नेते आमच्या मदतीला कधी येतील? आम्ही फक्त आमच्या हक्काचं आरक्षण मागितलं आहे. ओबीसीतून आम्ही १५० वर्षांपासूनचं आरक्षण आहे, तेवढं आम्ही मागितले आहे. मात्र, आरक्षण देण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत, असेही ते म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd