गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चांगलांच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे. त्यासाठी मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषण केलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत उपोषण सुरु केलं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासह आदी मागण्या मनोज जरांगे यांनी केलेल्या आहेत.
आता दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, यासाठी लक्ष्मण हाके यांनी जनआक्रोश यात्रा सुरु केली आहे. त्यामुळे आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात अनेकदा आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना इशारा देत आपण येवल्यामध्ये येऊन उपोषण करु शकतो, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा : Manoj Jarange : “अमित शाह यांना मराठा जात संपवायची आहे, ते मुडदे…”; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
मनोज जरांगे काय म्हणाले?
“छगन भुजबळ हे तिकडे येवल्यामध्ये बसले आहेत. आता मी देखील तिकडेच येवल्यामध्ये येऊन उपोषणाला बसतो. छगन भुजबळांनी मराठा समज आणि धनगर समाजामध्ये वाद लावला आहे. मी देखील तिकडे येवल्याकडे आंदोलनासाठी परवानगी काढायला सांगितली आहे. तिकडे येवल्यात उपोषणाला येतो आणि मग समजेल की उपोषण काय असतं?”, असा इशारा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना दिला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल करत राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा हल्लाबोल केला. याचवेळी मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सुरु केलेल्या जनआक्रोश यात्रेवरही टीका केली.
अमित शाह यांच्यावर जरांगेंचा गंभीर आरोप
“अमित शाह आमच्या प्रश्नांकडे कशाला लक्ष घालतील? ते मोठे लोकं आहेत, त्यांना आमची गरज नाही. जे मोठे आहेत त्यांना हे धरुन राहणार आहेत. ते शिर्डीला आले तेव्हाच त्यांनी म्हटलं होतं तुम्ही लक्ष घाला ते काहीही बोलले नाहीत. लोकांचे मुडदे पाडणारे लोक आहेत, त्यांचा चेहरा माणसाचा आहे पण आतून कपटाने भरलेले लोक आहे. त्यांचं काही खरं नाही. ते गरीबाला कधीही मोठं करु शकत नाही. त्यांना देशातल्या मोठ्या जाती संपवायच्या आहेत. महाराष्ट्रात मराठा मोठी जात आहे ती संपवायची आहे”, असा आरोप जरांगे यांनी केला.