गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. यासाठी त्यांनी अनेकदा उपोषणही केलं. मात्र, या मागणीबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी काही मराठा आंदोलकांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. तसेच यावेळी त्यांनी सूचक विधानही केलं. “दोन-तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश करणार”, असं मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे काय म्हणाले?

“मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आम्ही केलेली आहेच. फक्त सत्ताधारी पक्षाला नाही तर विरोधकांना देखील आम्ही सांगतो. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा. सत्ताधारी आणि विरोधकांनी ७० वर्ष आमचे मते घेतलेले आहेत. त्यामुळे भूमिका स्पष्ट केली पाहिजे. जर हे भूमिका स्पष्ट करत नसतील तर यावेळी मराठा समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

हेही वाचा : Uddhav Thackeray : “एक तर तू तरी राहशील किंवा मी…”, उद्धव ठाकरेंचे थेट आव्हान; नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी काही आंदोलकांनी आंदोलन केलं. यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “आता आम्ही टेन्शन घेत नाहीत. कारण लवकरच पर्दाफाश होणार आहे. कारण १२ ते १३ संघटना देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून दरेकरांनी जमा केल्या आहेत. मराठा समाजाच्या बाजूने न बोलता फक्त काहीही बोलायचं असं त्यांनी सांगितलं. आता आणखी दोन ते तीन दिवस थांबा, मग आणखी पर्दाफाश होईल. डोंबिवली, माहिम आणि मलबार हिलमध्ये आणि आणखी कुठे-कुठे बैठक झाली? या बैठकांना कोण-कोण होतं? कोण आमदार होते? हे माहिती आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“आता आमचं आंदोलन सुरु नाही. आमची मागणी आहे की ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना मराठेच मराठ्यांच्या अंगावर घालायचे आहेत. सध्या काय चित्र सुरु आहे हे क्लिअर होणार आहे. आरक्षणाच्या प्रश्नांबाबत सरकारने विरोधी पक्षांच्या दारात जावं किंवा विरोधी पक्षांनी सरकारकडे जावं. आरक्षणाबाबत भूमिका विचारण्यासाठी त्यांच्या दारात जाण्यासाठी आम्ही त्यांचे नोकर नाहीत. मराठा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम सुरु आहे. मराठा समाजामध्ये जाब विचारण्याची ताकद आहे. पण मला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस मला उघडं पाडण्यासाठी दरेकरांच्या माध्यमातून डाव रचत आहेत”, असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil on maratha obc reservation and devendra fadnavis uddhav thackeray maharashtra politics gkt