गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने मराठा आरक्षणावर योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा आमरण उपोषण केलं जाईल, असा अंतिम इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. २४ तारीख उलटून गेल्यानंतरही अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय घेतला नाही. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांच्या कामावर शंका उपस्थित केली आहे.
मराठा आरक्षणावर भाष्य करताना मनोज जरांगे म्हणाले, “मराठा आरक्षणाचा विषय खूप गंभीर आहे, अशी विनंती आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती. राज्यात मराठा समाजाची संख्याही खूप आहे. इतक्या मोठ्या समाजाची जर तुम्ही दखल घेणार नसाल तर हे दुर्दैव आहे. पूर्वी आम्हाला वाटत होतं की, तुम्ही (पंतप्रधान मोदी) गोरगरीबांची दखल घेताय, पण आता कुठेतरी आम्हाला बारीकपण वाटायला लागलं आहे. त्यांना विनंती करून सात दिवस झाले, पण त्यांनी सरकारला कसलीही सूचना दिली नाही. त्यामुळे ते खरंच गोरगरीबांची दखल घेतायत का? यावर थोडी शंका यायला लागली आहे.”
हेही वाचा- “मला एका गोष्टीची भीती वाटतेय”, मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळावरून संभाजीराजेंचं मोठं वक्तव्य
पंतप्रधान मोदींनी फोन केला तर लगेच मराठ्यांना आरक्षण देण्याची घोषणा होईल, अशी सूचक प्रतिक्रियाही जरांगे पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ एक फोन करू द्या आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाका, असं सांगू द्या. तर लगेच मराठ्यांना आरक्षण मिळेल. नरेंद्र मोदींचा फक्त एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना फोन आला, तर मराठा आरक्षणाची घोषणा होईल आणि सर्वत्र ब्रेकिंग न्यूज येतील. पण गोरगरीबांवर लक्ष द्यायला, त्यांच्याकडे वेळ आहे की नाही? यावर शंका आहे.