मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला २७ जानेवारी रोजी अशंतः यश आले. सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून तसा अध्यादेश काढला. त्यानंतर संबंध महाराष्ट्राने मराठा समाजाचे अभिनंदन केले. यानंतर ओबीसी नेत्यांकडूनही प्रतिक्रिया देण्यात आल्या. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांच्यासह अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अध्यादेश काढला म्हणजे आरक्षण मिळाले असे नाही, असे वास्तवही ओबीसी नेत्यांनी निदर्शनास आणून दिले. भाजपामधील ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र वेगळीच प्रतिक्रिया दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणणार का?

माध्यमांशी बोलत असताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “कुणबी प्रमाणपत्र घेऊन मराठा समाजाची एक पिढी आता ओबीसीमध्ये आलेली आहे. त्यामुळे त्यांनी आता एक मराठा, लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणायला हरकत नाही. ओबीसींमध्ये आधीच खूप जाती आहेत, त्यामुळे आरक्षणात दाटीवाटी होणार, हे नक्की. ओबीसी आरक्षणात आणि राजकीय परिस्थितीत यापुढे नक्कीच बदल होईल. समाजा-समाजामध्ये असंतोष निर्माण होऊ नये, याची जबाबदारी आता मराठा समाजाची आहे.”

“आता एक ओबीसी, लाख ओबीसी…”, पंकजा मुंडेंचा मनोज जरांगेंसह मराठा आंदोलकांना सल्ला

जरांगे पाटील काय म्हणाले?

पंकजा मुंडे यांच्या या विधानाबाबतच मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा माध्यमांनी प्रयत्न केला. आज आंतरवाली सराटी येथे आंदोलनस्थळी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील म्हणाले, “ओबीसी आण मराठा दोन्ही आम्हीच आहोत. मराठा हे शेतकरी आहेत आणि लढाऊ शेतकरीही आहोत. पण अजून १०० टक्के आरक्षण मिळायचे बाकी आहे. तेवढे मिळू द्या. मग काय बोलायचे हे ठरवू.”

“…तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील”, मनोज जरांगे पाटलांनी आंतरवली सराटीत स्पष्ट केली भूमिका!

अध्यादेश मिळाल्यानंतर आता पुढे काय होणार? त्याची कायद्याची प्रक्रिया कशी असते, याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, “या कायद्यामुळे किती फायदा होणार आहे? ते लोकांना समजावून सांगा. विरोध करणाऱ्यांनाही शांततेत उत्तर द्या. कायद्याला समर्थन द्या. एकच बाजू मांडत राहू नका. या अध्यादेशाचं आता अधिवेशनात कायद्यात रुपांतर होणार आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत जेवढ्या हरकती विरोधकांकडून घेतल्या जातील, तेवढ्याच त्याच्या सकारात्मक बाजू तुम्ही मांडा. सोशल मीडियावरही कायदा आवश्यक असल्याचं सांगा. आपल्याला सतत यावर सावध राहावं लागेल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil reaction on pankaja munde one obc one lakh obcs comment kvg
Show comments