जालन्यातील अंबड येथे ‘ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केलं आहे. आंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज झाल्यावर राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी जरांगेंना आंदोलनस्थळी आणून बसवलं, असा आरोप छगन भुजबळांनी केला होता. याला जरांगे-पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
“लाठीचार्ज झाल्यावर हे सरदार ( मनोज जरांगे-पाटील ) घरात जाऊन बसले होते. आमचे राजेश टोपे आणि रोहित पवारांनी त्यांना ( जरांगे-पाटलांना ) पहाटे तीन वाजता परत आंदोलनस्थळी आणून बसवलं होतं. त्यांना शरद पवार येणार असल्याचं सांगितलं. पण, शरद पवारांना लाठीचार्ज आणि पोलिसांवरील हल्ले कसे झाल्याचं सांगितलं गेलं नाही,” असे भुजबळांनी म्हटलं.
हेही वाचा : “तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही”, भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जरांगे-पाटील म्हणाले…
यावर जरांगे-पाटील म्हणाले, “‘मला विरोधकांनी बसवलं,’ असं छगन भुजबळ म्हणायचे. पण, विरोधक यांना सापडले नाहीत. नंतर सत्ताधाऱ्यांनी बसवल्याचं सांगण्यात आलं. यांना महत्व देण्याची गरज नाही. हे जनतेच्या आणि ओबीसी बांधवांच्या नजरेतून उतरले आहेत. छगन भुजबळांनी भानावर यावे.”
हेही वाचा : “तेव्हा लाज वाटली नाही का? तुम्ही महिला पोलिसांना…”, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंसह आंदोलकांवर गंभीर आरोप
‘दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला?’ अशी टीका भुजबळांनी केली होती. याबद्दल विचारल्यावर जरांगे-पाटलांनी म्हटलं, “ते समाज ठरवेल. लोकांनी तुम्हाला देव मानावं, असं वाटतं. तुम्ही लोकांचं रक्त पिता, पैसे खाता, मग तुम्हाला कोण शेंदूर लावेल?”