छगन भुजबळ दोन वर्ष बेसन, भाकर तुरूंगात खाऊन आले, असं सांगतात, होय आलो. मी दिवाळीत सुद्धा बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, अशी टीका मंत्री छगन भुजबळांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यावर केली होती. याला जरांगे-पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जरांगे-पाटील म्हणाले, “छगन भुजबळ वयाने मोठे आहेत. तुमची माहिती आम्हीही गोळा केलीय. येथे सासरा आणि जावयाचा प्रश्न नाही. आमच्या पायावर पाय देऊ नका अन्यथा तुमची काही खरे नाही. भानावर येऊन बोला, कारण मराठ्यांच्या शेपटीवर पाय दिल्यावर काय होते, हे पुढील काळात कळेल. धमक्या देऊन राज्यातील शांतात बिघडवू नका.”
हेही वाचा : “तेव्हा लाज वाटली नाही का? तुम्ही महिला पोलिसांना…”, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंसह आंदोलकांवर गंभीर आरोप
“आमचं आरक्षणावरील लक्ष हटणार नाही”
“छगन भुजबळांना टीका करण्यापलीकडे काही राहिलं नाही. मराठा समाज ओबीसीत आल्याचं त्यांना कळून चुकलं आहे. पण, कितीही टीका केली, तरी आमचं आरक्षणावरील लक्ष हटणार नाही. राज्यातील शांतता बिघडवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू झाले आहेत,” असा आरोपी जरांगे-पाटलांनी ओबीसी सभेतील नेत्यांवर केला.
हेही वाचा : ओबीसी एल्गार सभेतून छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, “पक्षपातीपणा कराल तर…”
“कोण कोणाचं खातंय, यावर भुजबळांना बोलू नये”
“भुजबळांना काय माहिती मी किती शिकलो आहे. ते खूप शिकले, तरीही लोकांचं खाल्ल्यामुळे तुरूंगात जाऊन आले. त्यामुळे कोण कोणाचं खातंय, यावर भुजबळांनी बोलू नये. राज्यात शांतता राखण्याचा प्रयत्न भुजबळांनी करावा. दंगली घडतील अशी वक्तव्ये भुजबळांनी करू नये,” असेही जरांगे-पाटलांनी खडसावलं आहे.