मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मागील काही महिन्यांपासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करणार असल्याचे त्यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच त्यांच्या उपोषणाची सुरुवात ४ जून रोजी म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा मराठा समाजाला कोणताही फायदा होत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
“माझा हा लढा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आहे. मी ४ जूनपासून पुन्हा बेमुदत उपोषण करणार आहे. मुळात सर्वच पक्षात मराठा समाजाचे नेते आहेत. मराठा कोणताही असला तरी त्याला राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा कोणताही फायदा झालेला नाही. यामध्ये भाजपातील गरीब मराठा समाजाच्या मुलांचंही नुकसान झाले आहे. सरकारने १० टक्के आरक्षण दिलं आहे, पण ते अजूनही लागू झालेलं नाही”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
हेही वाचा – मनोज जरांगेंची चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका! म्हणाले, “त्यांना काय कळतं? स्वतःची ३७ मतं….”
४ जूनपासून उपोषणाला सुरुवात
पुढे बोलताना ते म्हणाले, “४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल असला, तरी सकाळी ९ वाजता माझ्या उपोषणाची सुरुवात होईल. जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे. सहा कोटी मराठा समाजाचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे.”
“मराठा समाज गावोगावी शांततेत आंदोलन करतील”
दरम्यान, या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला काय आवाहन कराल, असं विचारलं असता, “मला आता समाजाला आवाहन करण्याची गरज वाटत नाही. मराठा समाजाला आता सगळं माहिती आहे. एका मुलाप्रमाणे ते माझी काळजी घेतात. माझे उपोषण सुरु झाल्यानंतर मराठा समाज गावोगावी शांततेत आंदोलन करतील, असा मला विश्वास आहे”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – “माझ्या कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव”, मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा
राज्य सरकारने दिले होते १० टक्के आरक्षण
२० फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले होते. नोकर भरती आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी २७ फेब्रुवारी रोजी सुधारित बिंदूनामावलीही जारी करण्यात आली होती. यासंदर्भात बोलताना मराठा समाजाला आरक्षण लागू झाले असून या आरक्षणाचा फायदा मराठा समाजातील तरुणांना नोकरी आणि शिक्षणात होईल, याचे मला समाधान आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.