मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात काढलेली पदयात्रा आज (२२ जानेवारी) अहमदनगर येथे दाखल झाली आहे. जरांगे पाटील आणि त्यांच्याबरोबर असणारे मराठा आंदोलनकर्ते उद्या पुण्यात दाखल होतील आणि बुधवारी मुंबईकडे रवाना होतील. मराठा आंदोलनकर्ते मुंबईत चक्काजाम आंदोलन करणार आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वी अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांनी रविवारी (२१ जानेवारी) बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन न करण्याचा सल्ला दिला होता. अजित पवार म्हणाले होते, “संवैधानिक पद्धतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे मनोज जरांगे यांनी धीर धरावा.” यावर मनोज जरांगे पाटील यांनी आज उत्तर दिलं. मनोज जरांगे पाटील म्हणाले, धीर कशाला म्हणतात हेच आता मला कळेना. त्यापेक्षा अजित पवारांना सांगा, एकदा इथे या, आरक्षणाच्या विषयावर बोलून दूध का दूथ आणि पाणी का पाणी करू.

मनोज जरांगे पाटील अजित पवारांना उद्देशून म्हणाले, गेल्या सात महिन्यांत तुम्ही एकदाही मराठा आंदोलनकर्त्यांशी बोलायला आला नाहीत. इतर अनेक नेते कित्येक वेळा येऊन गेले. तुम्हाला आंदोलनस्थळी येण्यासाठी गाडी हवी आहे का? हवं तर आम्ही तुम्हाला एसटीचं तिकीट काढून देऊ शकतो. तुम्ही एकदा या, आपण बोलू. मी अजित पवारांना उलट बोलत नाही. मराठा समाजातील लेकरांचं कल्याण होतंय, तुम्हीही त्यांच्यासाठी भूमिका घ्या.

हे ही वाचा >> “…तर आम्ही म्हणू, अजित पवारांनीच काडी लावली”, मनोज जरांगेंचा टोला

मनोज जरांगे पाटील म्हणाले, अजित पवार आम्हाला धीर धरायला सांगत आहेत. परंतु, आम्ही राज्य सरकारला एक-दोन नव्हे तर तब्बल सात महिन्यांचा वेळ दिला आहे. त्यामुळे तुम्ही (अजित पवार) आम्हाला धीर धरण्याचा सल्ला देण्याऐवजी सरकारशी मराठ्यांच्या बाजूने बोलायला हवं. सरकार आमच्याशी चुकीच्या पद्धतीने वागतंय हे सरकारला सागायला हवं. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी अजून किती वेळ हवा आहे? असा जाब तुम्हीच सरकारला विचारायला हवा. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. नोंदी सापडल्या नसत्या तर गोष्ट वेगळी होती. परंतु, आता तुम्हीच पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायला हवा.