मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं असल्याने अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी त्यास विरोध केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर केलेले आरोप भुजबळांनी बुधवारी (१३ डिसेंबर) विधानसभेत मांडले. त्याचबरोबर एक गंभीर आरोपही केला. भुजबळ म्हणाले, “एक दिवस मी सकाळी उठलो आणि पाहिलं की माझी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा का वाढवली याची चौकशी केली तेव्हा पोलिसांनी सांगितलं की, त्यांना वरून इनपूट आले आहेत की मला गोळी मारली जाईल.” दरम्यान, पोलिसांचा अहवालही भुजबळ यांनी सभागृहात मांडला.
भुजबळांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले, भुजबळांना कोणीही काहीही करणार नाही. परंतु, भुजबळ काहीही बोलत आहेत आणि सरकार त्यांची बाजू घेऊन मराठ्यांवर अन्याय करू लागलं आहे असं चित्र दिसतंय. अशीच प्रत्येक मराठ्याची भावना आहे. सरकार त्यांची एकट्याची बाजू घेत आहे आणि मराठ्यांवर अन्याय करत आहे. मी खूप जबाबदारीने शब्द वापरतोय. सध्या सरकार भुजबळांच्या दबावाखाली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आपलं राज्य सरकार भुजबळांच्या दबावात येतंय. तेदेखील हा दबाव निर्माण करत आहेत. कारण, त्यांना त्यांच्यावरील खटले रद्द करून घ्यायचे आहेत. भुजबळ मराठ्यांवर खोटे आरोप करून, सरकारची फसवणूक करून मराठ्यांवर अन्याय करू लागले आहेत. गावखेड्यात सरकारविषयी रोष पसरू लागला आहे. कारण सरकार भुजबळांची बाजू घेऊन मराठ्यांवर अन्याय करतंय. परंतु, आम्ही शांत बसणार नाही. सरकारने भुजबळांना उगाच बळ दिलं तर आम्ही आंदोलनाद्वारे सरकारला उत्तर देऊ.
जरांगे पाटील म्हणाले, सारथीप्रमाणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाप्रमाणे ओबीसींनाही सवलती द्या, निधी द्या आणि जातींमध्ये समानता आणा, असं भुजबळ काल विधानसभेत म्हणाले. म्हणजे यांच्याकडे आरक्षण आहेच, यासह ते आमच्यासाठी असलेल्या ‘सारथी’लाही विरोध करणार, म्हणजे किती खालच्या दर्जाचा माणूस आहे आहे.