मराठा आरक्षणाची मागणी करत मराठा क्रांती मोर्चाचे जालन्यातील समन्वयक मनोज जरांगे पाटील हे गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. शांततेच्या मार्गाने त्यांचं आंदोलन सुरू होतं. अशातच गेल्या आठवड्यात (१ सप्टेंबर) पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. या लाठीहल्ल्यावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. राज्यातले विरोधी पक्षांचे अनेक मोठे नेते जालन्यात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेऊन आले. या नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटलांची उपोषणस्थळी जाऊन विचारपूस केली. त्यामुळे राज्यभरातून जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला.
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी आता राज्य सरकार प्रयत्न करत आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी या गावात (उपोषणाचं ठिकाण) जाऊन भेट घेतली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. यावेळी त्यांच्याबरोबर मंत्री संदीपान भुमरे, माजी आमदार आणि शिंदे गटाचे प्रतिनिधी अर्जुन खोतकर उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी महाजनांच्या शिष्टमंडळाने मनधरणी केली. परंतु, गिरीश महाजनांची शिष्टाई अपयशी ठरली आहे.
गिरीश महाजन मनोज जरांगे पाटील यांची मधरणी करत असताना त्यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली. परंतु, जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. माझ्यावर आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव आणू नका असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. मनोज पाटील म्हणाले, मी सरकारला मागच्या वेळी तीन महिने दिले होते, आता तुम्ही पुन्हा वेळ का मागता? तुम्ही आरक्षण द्यावं असं मला वाटतं. तुम्हाला केवळ राज्याच्या सचिवांना म्हणायचं आहे आणि जीआर (अधिसूचना) काढायचा आहे.
यावेळी अर्जुन खोतकर जरांगे पाटलांना म्हणाले, तुम्ही राज्य सरकारच्या विनंतीचा विचार करा, तसेच या विनंतीबद्दल जनतेशी बोला. त्यावर जरांगे पाटील म्हणाले, माझ्या आंदोलनात पहिल्यांदा जितके लोक होते. तितकेच लोक आजही आहेत. त्यावेळी मी तुम्हाला वेळ दिला. फेब्रुवारीपासून मी हे आंदोलन करतोय. त्यावेळी आम्ही सरकारला वेळ दिला, आम्ही तेव्हा आततायीपणा केला नाही. तेव्हाही तुमचंच सरकार होतं आणि आजही तुमचंच सरकार आहे. आता गरज नसताना तुम्ही वेळ मागताय.
हे ही वाचा >> “आम्ही आंदोलन मागे घेत नाही, या सरकारला…”, गिरीश महाजनांशी केलेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य
दरम्यान, मंत्री संदीपान भुमरे मनोज जरांगे पाटील यांना म्हणाले, तुम्हाला यावेळी आरक्षण नाही मिळालं तर आम्ही जबाबदार राहू. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, यावेळी आरक्षण मिळालं नाही तर मी समाजाचं वाटोळे केलं असं होईल. त्यापेक्षा मला असंच उपोषण करून मरू द्या. मी असाच मेलेला बरा. नाहीच मिळालं आरक्षण तर मी उपोषण करताना मेलेला बरा. कारण आज मी समाजाला शब्द दिलाय. मी त्यांना सांगितलंय, आता शेवटचं लढतोय, यावेळी नाही झालं तर एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल.