मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेली पदयात्रा मंगळवारी (२३ जानेवारी) नगर रस्त्यावरील खराडी परिसरात दाखल झाली. मनोज जरांगे पाटील आणि हजारो समर्थक नगर रस्त्यावरील रांजणगाव, कोरेगाव भीमामार्गे खराडी-वाघोली परिसरात दाखल होतील आणि आज रात्री तिथेच मुक्कामी असतील. दरम्यान, खराडीत दाखल झाल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, छगन भुजबळांसारख्या लोकांमुळे समाजांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ते घरात बसून मनाला वाटेल तशी वक्तव्ये करत आहेत यामुळे मराठा आणि ओबीसींमध्ये तेढ निर्माण होत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे एकमेकांवर टीका-टिप्पणी करत होते. दोन्ही नेते एकमेकांवर खार खाऊन आहेत, असं बोललं जात होतं. परंतु, आता दोघांचाही सूर मावळला आहे. याबद्दल विचारल्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, एकमेकांवर खार खाऊन बोलायला त्यांनी माझा बांध फोडलेला नाही किंवा मीदेखील त्यांच्या वावरावर अतिक्रमण केलेलं नाही. कोणीही मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललं तर ती गोष्ट मला मान्य नाही.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, अजित पवार असो अथवा आणखी कुठलाही नेता असो, कुठलीही व्यक्ती मराठा आरक्षणाविरोधात बोलली तर मी त्या व्यक्तीला जुमानत नाही. कारण, माझ्यासाठी कोणतीही व्यक्ती जातीपेक्षा मोठी नाही. अजित पवार मागे प्रसारमाध्यमांना म्हणाले, आम्ही मराठा आंदोलनकर्त्यांवर कारवाई करू. त्यांच्या या वक्तव्यानंतर मी संतापलो. त्यांना असं बोलायची काय गरज होती. त्यामुळे आता जर मराठ्यांवर कारवाई झाली तर आम्ही म्हणणार की त्यांच्यामुळेच कारवाई झाली आहे. अजित पवारांनीच काडी लावलेली दिसतेय, त्यामुळे मराठा आंदोलनकर्त्यांवर कारवाई झाली असं आम्ही म्हणू. त्यांनीच ही गोष्ट पोलिसांच्या डोक्यात घातली, असं म्हणावं लागेल.

जरांगे पाटील बुधवारी मुंबईच्या दिशेने कूच करणार

मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा उद्या पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होईल. तेथून ही पदयात्रा लोणावळ्याकडे जाणार आणि बुधवारी सर्व आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने कूच करतील. पुणे पोलिसांकडून पदयात्रेच्या मार्गावर कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. एक हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, दंगल नियंत्रक पथक, गृहरक्षक दलाचे ८०० जवान तैनात केले जातील.

Story img Loader