मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांत राज्यभर अनेक आंदोलनं आणि उपोषणं केली. आरक्षणासाठी त्यांनी मुंबईपर्यंत मोर्चाही काढला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य करणारा अध्यादेश काढल्यानंतर विजयोत्सव साजरा करत मराठा आंदोलक स्वगृही परतले. परंतु, त्यानंतरही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील १० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. राज ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मराठा मोर्चेकरी विजयोत्सव साजरा करत माघारी फिरले. परंतु, त्यांना नेमका कसला विजय मिळाला, हे लोकांना कळले पाहीजे. मोर्चेकरी मराठा बांधवांना नेमका कसला निर्णय झाला हे कळलं का? तसेच तुम्ही विजयी झालात तर मग तुमच्यावर परत उपोषण करण्याची वेळ का आली?”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, राज ठाकरे म्हणाले, या आंदोलनाला आतून-बाहेरून कोणाचा पाठिंबा आहे ते सर्वांना माहिती आहे. केवळ ती गोष्ट उघड बोलता येत नाही. राज ठाकरे यांच्या या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. मनोज जरांगे म्हणाले, हे सगळे राजकीय डाव आहेत. काही जण राजकीय सुपाऱ्या घेतल्यासारखे बोलतात. मुळात आरक्षण ठेवलेलं असतं का? कोणीतरी गेलं आणि लगेच मिळालं असं काही असतं का? हवं तर राज ठाकरे यांनी माझ्या जागी यावं, मराठ्यांचं नेतृत्व करावं. एका दिवसात आम्हाला आरक्षण मिळवून द्यावं. आम्ही तुमच्या मागे उभे राहतो.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुळात आरक्षणाची एक मोठी प्रक्रिया असते. तुम्हाला यात काही मिळालं नाही म्हणून तुमची पोटदुखी सुरू झाली आहे. राज ठाकरे म्हणतायत आरक्षण मिळालं नाही. त्यांचं खरं आहे त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यांना पैसे पाहिजे होते, पद पाहिजे होतं, ते मिळालं नाही. मी दुकानंच बंद केली आहेत काही लोकांची.

मराठा नेते म्हणाले, राज ठाकरे सतत कोणाची तरी सुपारी घेऊन बोलतात. यावेळी ते सत्ताधाऱ्यांची किंवा इतर कोणाचीतरी सुपारी घेऊन बोलत आहेत. परंतु, त्यांच्या बोलण्याने काही होणार नाही. आता सर्व मराठे एकवटले आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय मराठे मागे हटणार नाहीत.

हे ही वाचा >> ‘जरांगे पाटील फसले की फसवले गेले?’, राजकीय अजेंड्याबाबत राज ठाकरे स्पष्टच म्हणाले…

मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे नेमका कसला विजय मिळाला, त्याचा मराठा समाज अभ्यास करतोय. परंतु, मुळात मला एक गोष्ट कळत नाही. राज ठाकरे कधीपासून असे मराठ्यांविरोधात बोलू लागले? ते जाऊन आले का नाशिकला? कारण ते कधी असं बोलत नव्हते. मराठ्यांच्या बाजूने बोलत होते. त्यांच्याबद्दल आम्हाला अपेक्षा नाही. राज ठाकरे यांना मानणारा मराठ्यांमध्ये एक वर्ग आहे. परंतु, त्यांच्यासारखे कायद्याचे अभ्यासक, राजकीय पटलावर भाषणं गाजवणारे नेते असं काहीतरी बोलतील असं मला वाटत नाही. आत्ता तुम्ही पत्रकार सांगत आहात यावर माझा विश्वास बसत नाहीये.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil says raj thackeray took money and speaks in favor of ruling party asc