मराठा आरक्षणाची मागणी करत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील हे ऑगस्ट महिन्यात उपोषणाला बसले होते. परंतु, एक महिन्याच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो असं आश्वासन देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं. तसेच मुख्यमत्र्यांना आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एक महिन्याऐवजी ४० दिवस दिले. ही ४० दिवसांची मुदत आता संपली आहे. अद्याप राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलेलं नाही, किंवा तशी कोणतीही मोठी कार्यवाही झालेली पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, मी माझ्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहे. काही वेळाने पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मांडेन, तसेच आंदोलनाची पुढची दिशा सर्वांना सांगेन. यापुढे मराठा समाजाने आंदोलन केलं तरी ते शांततेतच होईल, परंतु ते आंदोलन सरकारला पेलवणार नाही.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (मंगळवार, २४ ऑक्टोबर) छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि सांगितलं मराठ्यांना आरक्षण देणार. परंतु, ४० दिवसांत सरकारने काहीच केलेलं दिसत नाही. आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांचा सन्मान करतो. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतात असं सांगितलं जातं. परंतु, त्यांना कोणीतरी आरक्षण देऊ देईनात. ते लोक कोण आहेत हे आज दिवसभर शोधावं लागेल. त्यांना कोणीतरी आरक्षण देऊ देईनात की काय असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. परंतु, आमच्या लेकरा-बाळांचा प्रश्न आहे. त्यामुळे मी उपोषणावर ठाम आहे. मी आता उपोषणाला बसायला अंतरवाली सराटीला निघालो आहे.

हे ही वाचा >> Manoj Jarange Patil : आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला

जरांगे पाटील म्हणाले, सरकारने मराठ्यांना न्यायालयात टिकेल असं आरक्षण द्यावं. इतरांना जसं दिलं तसंच आरक्षण द्यायला हवं. मराठा समाज आरक्षणाच्या सर्व निकषांमध्ये बसतो. त्यामुळे सतत कोणीही कायद्याचा उल्लेख करून टाळाटाळ करू नये.मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देवून आमचा सन्मान करावा. कारण ते शब्दाला पक्के आहेत, अशी मराठा समाजात भावना तयार झाली आहे. त्यांनी त्या शब्दाला जागावं. त्यांनी आता आरक्षण द्यावं.

Story img Loader