Manoj Jarange Patil Hunger Strike : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १३ जुलैपासून ते उपोषणाला बसले होते. मात्र आता त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिली आहे. सरकारने जरांगेंकडे दोन महिन्यांची मुदत मागितली होती. त्यानुसार आता जरांगे यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. यापूर्वी, जरांगे यांनी राज्य सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. मात्र १३ जुलैपर्यत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्यामुळे मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले होते. मात्र मंगळवारी (२३ जुलै) रात्री मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली होती. परिणामी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने सलाईन लावली. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आता सलाईन लावून उपोषण करण्यास नकार दिला आहे. “मी सलाईन लावून बेगडी उपोषण करणार नाही”, असं सांगत त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझा हट्ट होता की मला सलाईन लावू नका, तसं केलं तर समाजाला मिळत आलेलं आरक्षण मिळणार नाही. हे उपोषण किंवा हे आंदोलन ही मराठा समाजाची शक्ती आहे, हे आपल्याकडे असलेलं शस्त्र आहे. या शक्तीचा मला पूर्ण उपयोग करायचा होता. सरकार माझं ऐकेल, त्यांना ऐकावं लागेल असं वाटत होतं. परंतु, माझं कोणी ऐकलं नाही, त्यांनी मला सलाईन लावलीच. मी त्यांना सांगत होतो, सरकार बेमुदत उपोषणाला घाबरतं, त्यांना खुर्ची गमावण्याची भीती असते. मात्र आता सलाईन लावली आहे. त्यामुळे मी आता ठरवलं आहे की असं सलाईन लावून बेगडी उपोषण करण्यात करण्याला काही अर्थ नाही, सलाईन लावून, एका जागेवर पडून राहून मी उपोषण करणार नाही. मी असं केलं तर तो बेगडीपणा ठरेल. अशा प्रकारचं उपोषण मी करू शकत नाही त्यापेक्षा मी असं उपोषण न केलेलं बरं या मातावर मी आता आलो आहे.
![Manoj Jarange Patil](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/Manoj-Jarange-Patil-fb-3.jpg?w=830)
हे ही वाचा >> Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांच्या मनातले मुख्यमंत्री नाहीत, त्यामुळेच…”; संजय राऊत यांचा आरोप
उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पुढे काय करणार?
जरांगे म्हणाले, सलाईन घेऊन इथे पडून राहण्यापेक्षा मी १०-१२ दिवस महाराष्ट्रात फिरेन. वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन तयारी करेन. तिथे मोर्चे आणि रॅली काढण्याची तयारी करेन. सरकारमधील लोकांचा जीव त्यांच्या खुर्चीत आहे, ती खुर्ची कशी धोक्यात येईल त्यासाठी काम करेन. मी इथे पडून काय करू? त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की लोक मला सलाईन लावत राहणार आणि मी इथं पडून राहणार त्यामुळे मी ठरवलंय, आज (२४ जुलै) दुपारी मी उपोषण स्थगित करेन. कारण मी अशा प्रकारे उपोषण करणारा माणूस काही, त्याला काही अर्थ नाही. अशा उपोषणाने समाजाला न्याय मिळेल की नाही हे माहिती नाही. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की आपण हे उपोषण स्थगित करूया.