मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. तरीदेखील त्यांनी उपचारासाठी नकार दिला होता. मात्र त्यांच्या प्रकृतीची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. जरांगे यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करा, असा आदेश न्यायालयाने दिला. दरम्यान, त्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून मराठा समाजातून सरकारप्रती नाराजी व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपोषणाचा सातवा दिवस, उपाचर घेण्यास होकार

सगे-सोयरे यांच्याविषयीचा जो अध्यादेश राज्य सरकारने आणला आहे त्याचं रुपांतर कायद्यात करा अशी प्रमुख मागणी करत मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. जालना जिल्ह्यातील आंरवाली सराटी या गावात जरांगे यांचे उपोषण चालू आहे. त्यांच्या उपोषणस्थळी मराठा समाजाचे शेकडो आंदोलक जमा झाले आहेत. प्रकृतीची काळजी घ्यावी, तुम्ही उपचार करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती गेल्या काही दिवसांपासून या आंदोलकांकडून केली जात होती. मात्र मनोज जरांगे हे पाणी पिण्यास तसेच उपचार करण्यास नकार देत होते. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी आता उपचारास होकार दिला आहे. त्यांचा उपोषणाचा सातवा दिवस आहे.

सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वर्षा येथे आज सकाळी हा अहवाल सुपूर्द करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते.

“त्रागा न करता शांत बसावं”

दरम्यान, मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्यामुळे राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाकडून ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. “मनोज जरांगे शिव्या द्यायला लागले आहेत. तेही आईवरून शिव्या देत आहेत. गल्लीवरचे लोक शिव्या देतात तशा शिव्या देत आहेत. तिथे असणाऱ्या एसपी, जिल्हाधिकाऱ्यांना ते तुम्ही सगळे भा*** आहात असं म्हटल्याचं चॅनल्सवर दिसलं. त्यांनी असा त्रागा न करता शांत बसावं. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा आम्ही पारित करतो आहोत. शिव्या देऊन किंवा आणखी भानगडी करून काय फायदा आहे? सगेसोयरेच्या माध्यमातून जे तुम्ही कुणबी म्हणत घुसवले आहेत, त्याविरोधात आमचा लढा चालूच असणार आहे”, असे भुजबळ म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil seventh day of hunger strike eknath shinde to hold press conference on maratha reservation prd