कुणबी दाखल्यासह ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसह मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक खडाजंगी चालू आहे. दोघेही एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. परंतु, दिलेल्या मुदतीत हा प्रश्न सुटू शकला नाही. त्यामुळे राज्य सरकार मुदत वाढवून मिळावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करू लागलं आहे. त्यावरून छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्यावर उपरोधिक टीका केली. “जरांगे यांच्या मनात रोज नवनवीन कल्पना येतात. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मी करतो, असं भुजबळ म्हणाले.
भुजबळांच्या या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाविषयी चांगलं बोलावं इतका त्यांचा स्वच्छ हेतू कधीच नव्हता. ही बाब जर मराठा समाजाला आधी समजायला हवी होती. हा खूप खालच्या दर्जाचा विचार करणारा माणूस आहे. मराठ्यांना हे आधीच समजलं असतं तर त्यांनी कधीच याला मोठं केलं नसतं. मराठ्यांना वाटत होतं की, हा माणूस चांगल्या विचारांचा आहे. पण त्याच्या डोक्यात गटारातले किडे भरले आहेत.
मनोज जरागे पाटील म्हणाले, मराठे छगन भुजबळांना चांगला माणूस समजत होते. त्यामुळे त्यांनी भुजबळांना मोठं केलं. परंतु, आता ते मराठा समाजाविरोधात गरळ ओकू लागले आहेत. परंतु, आता लोकांना समजलंय की या माणसाच्या आत किती मोठी गटारगंगा आहे. याच्या डोक्यात मराठा समाजाविषयी विष आहे. ते नेहमी कुचकं बोलत असतात. मी भुजबळांना एकच सांगेन, आमच्या नादी लागू नका, शहाणे व्हा.
हे ही वाचा >> “त्यांच्या डोक्यात गटारातले…”, मनोज जरांगेंची छगन भुजळांवर शेलक्या शब्दांत टीका
भुजबळ काय म्हणाले होते?
छगन भुजबळ म्हणाले होते की, “जरांगे पाटील यांच्या मागण्या तर्काला धरून आहेत, नियमाला धरून आहेत. सरकारच त्यांचे काही ऐकत नाही, असे चित्र निर्माण झालेले दिसते. जरांगेच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या पाहिजेत.” जरांगेनी सरकारला वेठीस धरले आहे का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारल्यावर भुजबळ म्हणाले, मनोज जरांगेंनी सरकारला वेठीस धरलेलं नाही तर सरकारनेच जरांगेंना वेठीस धरलं आहे. मी याआधी केलेली माझी सर्व भाषणं मागे घेत असून जरांगेंच्या अभिनव कल्पनांना मान्यता देत आहे. कायदे बदलून टाकावेत. पुढच्या मेळाव्यात मी त्यांच्या बाजूने भाषणं करणार आहे.”