राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असतानाच ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू झाला आहे. राज्यातील ज्या मराठा कुटुंबांकडे मागील दोन-तीन पिढ्यांमधील कुणबी असल्याचे पुरावे आहेत अशा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार आहे. परंतु, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. यावरून, मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध चालू आहे. दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.

जालन्यातील आंबड येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्या खासगी आयुष्यावर भाष्य करत टीका केली होती. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटीलदेखील भुजबळांवर टीका करू लागले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे मोठी सभा पार पडली. या सभेत मनोज जरांगे पाटील छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळत आणि एकेरी उल्लेख करत म्हणाले की, तू कुठे भाजी विकत होतास, कोणाचं काय करत होतास, मुंबईत काय-काय केलं, कोणत्या नाटकात आणि चित्रपटात काम केलं याची मला माहिती आहे. तू कोणाचा बंगला बळकावला हेदेखील मला माहिती आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, तू महाराष्ट्रातल्या जनतेचं खाल्लंस, महाराष्ट्र सदनाचा पैसा खाल्ला, महाराष्ट्रात सदनाचा पैसा हा महाराष्ट्रातील जनतेचा होता, तो पैसा तू खाल्लास, त्यामुळे तुला जनतेचा, गोरगरिबांचा तळतळाट लागला. म्हणूनच तू तुरुंगात गेलास. तिथं बेसण-भाकरी खाल्ली. आता म्हणतो तिथे कांदाही मिळत होता. मग अजून कांदा खा. पाच किलो कांदा खा.

हे ही वाचा >> “तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही म्हणूनच…”, मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

मनोज जरांगे यांची मंगळवारी ठाण्यातही सभा पार पडली. या सभेतही जरांगे यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला होता. जरांगे पाटील म्हणाले, म्हातारपणात त्याला काहीच सुचेना झालंय. आपण त्याचं नाव घेत नाही. आपण कोणाचं नाव घेतलंही नाही आणि घेणारही नाही. कारण त्यांची तेवढी लायकी राहिलेली नाही. मुंबईत तो काय करतो ते माहितीय. त्याच्याकडे कोणते पाहुणे राहायला आले होते. त्याने कोणत्या पिक्चरमध्ये काम केलंय. मला त्याच्याबद्दल सगळं माहितीय.

Story img Loader