देशात आणि राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झाला आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली असून सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या आघाड्यांनी एकमेकांवर जाहीर सभांमधून टीका-टिप्पणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे राजकीय पक्ष जागावाट, टीका-टिप्पणीत व्यग्र असताना दुसरीकडे मराठा आरक्षण व आंदोलनाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मोठं आवाहन केलं आहे. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा उपोषणाचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. येत्या ४ जूनपर्यंत अर्थात लोकसभा निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत जर सरकारनं मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही, तर आपण पुन्हा उपोषण करू, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्याशिवाय, आम्ही विधानसभा निवडणुकीत उतरू आणि सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू, असं विधानही त्यांनी केलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारी असल्याचं नमूद केलं आहे.
“देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांविषयी खूपच प्रेम”
यावेळी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत टोला लगावला. “देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे. माता-माऊलींवर गोळ्या घालणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बढती दिली आहे. पोलिसांच्या माध्यमातून चार महिन्यांपूर्वीचे गुन्हे अगदी कालपर्यंत दाखल करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे ते गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखे आहेत”, असं ते म्हणाले.
मराठा समाजाला जरांगेंचं आवाहन
“मराठा समाजानं एक लक्षात घ्यावं, पाडण्यातही मोठा विजय आहे. पाडा यांना. मराठ्यांनी १०० टक्के मतदान करावं. यांना इतक्या ताकदीनं पाडा की इथून पुढे यांना मराठ्यांच्या मतांची किंमत कळली पाहिजे. मराठ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे. आता मराठा समाज यांचा राईट कार्यक्रम करेल. पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. महायुतीनं आम्हाला फसवलं आहे. सरकारला आमच्या छातीत लागलेल्या गोळ्या दिसत नाहीयेत. समाजाला बरोबर कळलंय कुणाच्या विरोधात मतदान करायचंय. मराठे कुणाच्याही सभांना जात नाहीयेत. निकालाच्या दिवशी राईट कार्यक्रम होईल”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा माणूस, प्रसिद्धीसाठी मराठा मुलांचा…”, आता कुणी केले गंभीर आरोप?
देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र
“मी अजूनही गृहमंत्र्यांना सांगतो. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. मी निष्ठावान आहे. मी माझी जात विकू शकत नाही. तुम्ही माझ्या नादी लागू नका. मला तुम्ही आंदोलनात हलक्यात घेतलं होतं. मला राजकारणात हलक्यात घेऊ नका. मला तिकडे जायचं नाहीये. पण मला राजकारणात ओढायचा प्रयत्न केला, तर तुमचा कायमचा कार्यक्रम लागेल. दलित, मराठा, मुस्लीम, लिंगायत, बारा बलुतेदार असे सगळे आम्ही एकत्र येणार आहोत. यांनी दोन उपमुख्यमंत्री केले, आमचे सात होऊ द्यात. होऊ द्या सगळ्यांचे एकेक”, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेसंदर्भात सूचक विधान केलं आहे.
“१५ लाख रुपये प्रति व्यक्ती देत होते”
दरम्यान, यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. “आत्ता त्यांच्या लोकांनी पैसे वाटले. ४-५ दिवसांत त्यांनी एक डाव टाकला होता. १५ लाख रुपये माणूस. १२३ गावातले १०० लोक त्यांना फोडायचे होते. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी पैसे घेऊन गेले होते. आम्हाला ४-५ दिवसांत पूर्ण माहिती मिळणार आहे. तेव्हा सविस्तर सांगेन. ते म्हणतायत हे पैसे राहू द्या तुम्हाला खर्चायला. १५ लाख रुपये खर्चायला? समोरचा एक जण १५० एकरचा होता. तो म्हणाला माझ्याकडून ५० लाख घेऊन जा आणि तुझे कोण गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांना दे”, असा दावा जरांगे पाटील यांनी केला.