“राज्य सरकार आमच्याबरोबर राजकारण करत आहे. आमच्या हक्काचं आरक्षण द्यायला टाळाटाळ करत आहे”, असं म्हणत मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जरांगे बोलत होते. ते म्हणाले, “हे सरकार केवळ आमच्या समाजातील पाच ते दहा लोकांना मोठं करू पाहतंय. ओबीसींमधून पाच-दहा लोकांना मोठं करू पाहतंय आणि उर्वरित समाजाकडे दुर्लक्ष करतंय. मात्र आता असं चालणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हेच माझं एकमेव उद्दिष्ट आहे. मी खानदानी मराठा आहे, मी कुणाचा पैसा घेणार नाही, मला कोणतंही पद नको, मला केवळ मराठा समाजातील लेकरांना मोठं करायचं आहे. हे सत्ताधारी लोक फार फार तर मला मारून टाकतील. त्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत. मला मारायचं असेल तर मारा, परंतु मी थांबणार नाही, बदलणार नाही.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मला हा सगळा खाटाटोप करून पैसे कमवायचे नाहीत आणि ही गोष्ट माझ्या समाजाच्या लक्षात आली आहे. त्यांना समजलंय की हा (मनोज जरांगे) आपल्या मुलांसाठी धडपडतोय आणि त्यालाच आता सरकारने चारही बाजूंनी घेरलं आहे. त्यामुळे ते आता मला एकटं पडू देत नाहीत. त्यांनी ठरवलं आहे आपण अजून किती दिवस नेत्यांना मोठं करायचं? हे नेते केवळ स्वतःच्या मुलांना मोठं करू पाहतात, केवळ मंत्रिपदासाठी झटतात. परंतु, आता समाजाला समजलंय की आपली मुलं मोठी करायची आहेत. आपल्या मुलांना आरक्षणाच्या माध्यमातून अधिकारी करायचं आहे आणि मनोज जरांगे आपल्या मुलांसाठी लढतोय. त्यामुळे ते माझ्या बाजूने उभे आहेत आणि मराठा समाज आता उसळला आहे.”

हे ही वाचा .> “लवकरच न्याय मिळणार”, पक्षफुटीच्या प्रकरणावरील सरन्यायाधीशांच्या ‘त्या’ टिप्पणीमुळे शरद पवार गटाच्या आशा पल्लवित

मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

मराठा समाजासाठी लढणारे कार्यकर्ते म्हणाले, गाव खेड्यासह शहरातील मराठे आमच्या या आंदोलनात सहभागी होत आहेत. तरी आत्ता आमचा ५० टक्के समाज इथे उपस्थित नाही. तो पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला गेला आहे. मात्र उरलेला सगळा समाज एकवटला आहे. कारण त्यांच्या मनात या सरकारविरोधात रोष आहे. त्यांना माहिती आहे की हे सरकार आपल्याला न्याय देत नाही. संपूर्ण जातीत सरकारविरोधात रोष पसरला आहे. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांना वाटतं की मी मराठ्यांच्या काही नेत्यांना मोठं करेन आणि जातीकडे दुर्लक्ष करेन. परंतु, त्यांना एक गोष्ट समजली नाही की ही जात आता त्यांचं ऐकणार नाही. जातीतले लोक आता फडणवीसांना सांगू लागले आहेत, तुम्ही नेत्यांना मोठं करा आणि त्यांना घेऊन फिरा. आम्ही तुम्हाला योग्य वेळी उत्तर देतो. मी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा सांगतो, तुम्ही आमचे शत्रू नाही, आम्हाला केवळ आमच्या हक्काचं आरक्षण द्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil slams devendra fadnavis over maratha reservation in nander rally asc