गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी पु्न्हा एकदा मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. महिन्याभरापूर्वीही त्यांनी असंच आंदोलन केलं होतं. तेव्हा मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारने महिन्याभराची मुदत मागितली होती. मात्र, २४ ऑक्टोबरला ही मुदत संपल्यानंतरही आरक्षणाचा निर्णय झाला नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमवीर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर असताना भाषणात त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा उल्लेखही केला नाही, असं म्हणत आता मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर कारस्थान केल्याचा आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

“परवा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. पंतप्रधानांना त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सांगितलं असेल असं वाटलं होतं. पण पंतप्रधानांना या दोघांनी मराठा आरक्षणाबाबत व त्यासाठीच्या आंदोलनाबाबत सांगितलं नाही अशी शंका आहे. जर त्यांनी सांगितलं असेल, तर पंतप्रधानच जाणूनबुजून काल त्यावर काही बोलले नाहीत का? पंतप्रधानांना गोरगरीबांची गरज राहिली नाही, असा अर्थ महाराष्ट्रातील जनता आता काढायला लागली आहे”, असं जरांगे पाटील म्हणाले.

“आत काहीतरी शिजतं आहे, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ..”, मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य

“पंतप्रधान बोलले काय किंवा नाही बोलले काय, मराठ्यांना काही फरक पडत नाही. पण समाज शांत यासाठी होता की पंतप्रधान हा विषय हाताळतील असं समाजाला वाटलं होतं.मुख्यमंत्र्यांना हा विषय मार्गी लावण्याबाबत सांगतील असं वाटलं होतं. पंतप्रधानांच्या बाबतीत मराठ्यांच्या मनात वैरभावना नव्हती. जर तशी असती, तर पंतप्रधानांचं विमानही शिर्डीत खाली उतरू दिलं नसतं. ते वरचेवरच परत पाठवलं असतं”, असंही जरांगे पाटील यांनी नमूद केलं.

“गरीबांची पंतप्रधानांना गरज राहिली नाही”

“आता गोरगरीबांची गरज पंतप्रधान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना गोरगरीबांची गरज राहिली नाही असा संदेश महाराष्ट्र व देशभरात गेला आहेत. त्यांनी आमच्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. मराठ्यांनी त्यांना ४० दिवसांचा वेळ घेतला होता. पण आरक्षण दिलं नाही. याचा अर्थ सरकारसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची मुलं मोठी होऊ नये हे षडयंत्र रचलं होतं”, असा थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

तुम्ही मराठ्यांचा ओबीसीत समावेश का करत नाही? मराठा समाजाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला पाहिजे यासाठीच तुम्ही आरक्षण देत नाही आहात. सगळ्या गोष्टी तुमच्या अंगलट आल्या आहेत. पुरावे मिळूनही आरक्षण देत नाही, त्यामुळे तेही तुमच्या अंगलट आलंय. तुम्हाला नाक नसल्यासारखं झालंय. तुम्ही मागाल ते मराठ्यांनी दिलं आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil slams pm narendra modi cm eknath shinde devendra fadnavis on maratha reservation pmw