मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे त्यांची आरक्षणाची मागणी घेऊन आता मुंबईत आंदोलन करणार आहेत. २० जानेवारी रोजी ते त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर आणि मराठा समुदायातील लोकांबरोबर मुंबईची वाट धरणार आहेत. त्यानंतर ते मुंबईतल्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन करू नये, काही दिवस थांबावं आणि राज्य सरकारला वेळ द्यावा, जेणेकरून राज्य सरकार मराठा आरक्षणाचा तिढा सोडवू शकेल, अशी विनंती राज्य सरकारमधील अनेक नेत्यांनी केली आहे. परंतु, मनोज जरांगे मागे हटण्यास तयार नाहीत. त्यांनी आज पुन्हा एकदा सांगितलं की, ते त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर २० जानेवारी रोजी मुंबईत धडक देतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, तुमच्या आंदोलनाच्या आदल्या दिवशी म्हणजे १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यमुळे तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधानांशी बातचीत करणार आहात का? यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, ते (नरेंद्र मोदी) महाराष्ट्रात आले किंवा आणखी कुठे आल्याने आम्हाला काय फायदा होणार? ते मागे शिर्डीला आले होते, तेव्हाच आम्ही त्यांना आमचा विषय सांगितला होता.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही मोदींना म्हटलं होतं की, तुम्ही सुरुवातीपासून सामान्यांचं नेतृत्व करत आलेले आहात. तुम्ही स्वतः सामान्यांमधून पुढे आलेले आहात. तुम्हाला सामान्यांची जाण आहे. त्यामुळे तुम्ही राज्य सरकारला आदेश द्या. राज्य सरकारला सांगा की, मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण द्या. मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यामुळे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊन टाका. आम्ही आमचे मुद्दे त्यांना सांगितले होते. परंतु, त्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या शिर्डी दौऱ्यानंतर ते दोन वेळा महाराष्ट्रात येऊन केले. परंतु, त्यांनी काही केलं नाही.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले किंवा आणखी कुठे आले, त्याच्याशी आमचं काही देणंघेणं नाही. जो सामान्यांच्या बाजूने बोलणार नाही, ज्यांना सामान्यांची आता गरज उरली नाही, त्यांच्याशी आमचं देणंघेणं नाही. आम्हाला वाटायचं त्यांना या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य आहे. त्यामुळे ते मराठ्यांना आरक्षण देऊ शकले असते. खरंतर मराठा आरक्षण हा केंद्राच्या अधिकारातला विषय नाही. तो राज्य सरकारचा विषय आहे. परंतु, राज्यात एवढं वातावरण ढवळून निघालं आहे, त्यावेळी त्यांनी हस्तक्षेप करणं आवश्यक होतं. त्यांनी राज्य सरकारला सांगायला हवं होतं की, मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका.

हे ही वाचा >> VIDEO : “…तर कशाला झाली असती दाटीवाटी”, एकाच कारमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची गर्दी पाहून ठाकरे गटाचा टोला

आम्ही मोदींकडून आशा सोडली आहे : मनोज जरांगे

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही हा जो काही लढा देत आहोत तो आजचा लढा नाही. हे रान एका दिवसात ढवळून निघालेलं नाही. गेल्या चार-पाच पिढ्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी होत आहे. त्यामुळे मोदींनी राज्य सरकारला सांगायला हवं होतं की, मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका. परंतु, दोन शब्द वापरायला त्यांना कसली अडचण होती. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. पंतप्रधानांनी त्यासाठी एखादा शब्द काढणं अपेक्षित होतं. परंतु, त्यांनी मराठा समाजासाठी एकही शब्द उच्चारला नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा सोडून दिली आहे. तुम्ही महाराष्ट्रात या किंवा आणखी कुठेही या, मराठ्यांनी आता तुमच्याकडून आशा सोडली आहे. ज्यांना आशा असेल त्या मराठ्यांनीदेखील ही आशा आता सोडावी.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil slams pm narendra modi for not seaking on maratha reservation asc