मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (५ सप्टेंबर) भेट घेऊन मध्यस्थी केली. परंतु आरक्षणासंबंधी अधिसूचना निघत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असं सांगत जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखी चार दिवसांची मुदत देऊन उपोषण सुरूच राहील, असं स्पष्ट केलं. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. या उपोषणामुळे जरांगे पाटलांची तब्येत खूप खालावली आहे.
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सलाईन लावली आहेत. त्यामुळे त्यांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. जरांगे पाटलांच्या कुटुंबियांनीदेखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, टीव्ही ९ मराठीने मनोज जरांगे पाटील यांचा मुलगा शिवराज याच्याशी बातचीत केली. यावेळी शिवराजने वडिलांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली. शिवराज हा १९ वर्षांचा असून तो सध्या बी. टेक. करतोय.
शिवराज मनोज जरांगे-पाटील म्हणाला, “मला आता पप्पांची काळजी वाटतेय. गेल्या नऊ दिवसांत पप्पांच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. त्यामुळेच त्यांची काळजी वाटू लागली आहे. मी पप्पांना सांगेन आपल्याला आरक्षण हवं आहे, पण तुम्ही तुमच्या तब्येतीला जपा. आपला संपूर्ण समाज अनेक दिवसांपासून लढतोय. समाजाला न्याय मिळायला हवा. यासाठी आपण लढत राहू आणि न्याय मिळवू.” वडिलांच्या प्रकृतीबद्दल बोलत असताना शिवराजचे डोळे पाणावले होते.
हे ही वाचा >> Video: “तुम्ही ‘भारत’ म्हणता, समजा आम्ही…”, ‘इंडिया’ नावाच्या वादावरून विरोधकांचा मोदी सरकारला खोचक सवाल!
शिवराज म्हणाला, पप्पांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्यांची काळजी सरकार घेईल. कारण या सरकारला कळत नाही, किती दिवसांपासून ते उपोषण करत आहेत. या सरकारला त्यांची काळजी असायला हवी. पप्पांसाठी आणि आमच्यासाठी आधी समाज महत्त्वाचा आहे आणि मग आपलं घर. माझं पप्पांना हेच सांगणं आहे की आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे. आपल्याला आरक्षण पाहिजेच.