मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत होते. त्यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला थेट इशारा दिला आहे.

४० दिवसांत मराठा आरक्षण मिळालं नाही, तर आम्ही कशी फजिती करतो, हेच पाहा, अशा शब्दांत मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “एकदा शब्द दिल्यावर आम्ही मराठे मागे हाटत नाही. पण आम्हाला ४० दिवसांनी आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करायचं? तुमच्या समितीनं काय करायचं? या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही मिळवणार म्हणजे मिळवणार.”

हेही वाचा- “मराठा आंदोलन मोडून काढण्यासाठी संभाजी भिडेंना…”, ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर गंभीर आरोप

“हे आंदोलन सर्वसामान्य लोकांनी उभं केलं आहे. तुम्ही आतापर्यंत सगळे डाव टाकले आहेत. आता डाव टाकण्याची वेळ आमची आहे. आमचा डाव पडला तर तुमची कशी फजिती करतो, ते पाहाच,” अशा शब्दात मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

हेही वाचा- ओबीसी आरक्षणातले वाटेकरी कसे वाढले? छगन भुजबळांनी सांगितली आकडेवारी

सरकारला उद्देशून मनोज जरांगे पुढे म्हणाले, “तुम्ही आधी सांगितलं की आमचं आंदोलन विरोधीपक्षाने उभं केलंय. नंतर तुम्हाला काहीच सापडलं नाही. आता वेगळंच सांगितलं जातंय की, हे आंदोलन सत्ताधाऱ्यांनीच उभं केलंय. पण असं कधी होऊ शकतं का? त्यांचे सगळे डाव आता सर्वसामान्य लोकांनी ओळखले आहेत.”

Story img Loader