जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी उपस्थित होते. या सभेच्या खर्चावरून मंत्री छगन भुजबळ यांनी सवाल उपस्थित केला होता. आंतरवाली येथील सभेसाठी ७ कोटी रूपये कुठून आणले, असा प्रश्न भुजबळ यांनी विचारला होता. याला आता जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळांना समज द्यावी. अन्यथा माझ्या नादाला लागल्यावर मी सोडत नाही,” अशा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. ते सराटी येथे मराठा कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
हेही वाचा : “कुणबी प्रमाणपत्र, कोपर्डीच्या नराधमांना फाशी आणि…”, मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारकडे ‘या’ मागण्या
जरांगे पाटील म्हणाले, “गोधा पट्ट्यातील १२३ गावांतील २२ गावांनी पैसे दिले आहेत. आणखी १०१ गावांकडेही पैसे शिल्लक आहेत. पण, पैसे घेतले नाहीत. कारण, हे आंदोलन पैशांसाठी नाहीतर न्यायासाठी आहे. भुजबळांना जमिनी घेण्याचं वेड लागलं आहे. पैसे जनतेचे खातात. त्यामुळे भुजबळांना वाटलं आपण सभेसाठी जमीन विकत घेतली आहे.”
“आम्ही कोटी हा शब्द पहिल्यांदा ऐकला आहे. आम्ही दुसऱ्यांकडून पैसे घेऊन दुचाकीत पेट्रोल टाकतो. मग सात कोटी रूपये कुठून पाहणार? अजित पवार यांनी भुजबळांना समज द्यावी. अन्यथा माझ्या नादाला लागल्यावर मी सोडत नाही,” असं जरांगे पाटलांनी म्हटलं.
हेही वाचा : “…आता एक इंचही मागे हटणार नाही”, मोंदीसह अमित शाहांचा उल्लेख करत मनोज जरांगेंचा थेट इशारा
“लोक १० रूपयेही देत नाही, असं भुजबळ म्हणतात. तुम्हाला लोक पैसे देत नसतील. गोरगरीब मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं. त्या लोकांचं रक्त पिऊन पैसे कमवण्याचं काम तुम्ही केलं. म्हणून तुमच्याकडं धाड पडली. गोरगरीब मराठ्यांचे पैसे खाल्ल्यामुळे दोन वर्षे जेलमध्ये बेसन खावं लागलं,” अशी टीकाही जरांगे पाटलांनी भुजबळांवर केली.