२६ जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील शनिवारी ( २० जानेवारी ) जालना जिल्ह्यातून रवाना झाले. मनोज जरांगे-पाटील यांचा पायी मोर्चा अहमदनगर जिल्ह्यात पोहोचला आहे. आता जरांगे-पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या शासकीय नोंदी आढळल्या असून हक्काचं आरक्षण द्यावं. बाकीचे प्रयत्न करायला गेल्यास त्याचे दूरगामी वाईट परिणाम होतील, असं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधत होते.
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण असूनही देण्यात आलं नाही. आता आरक्षण मिळालेलं असूनही सरकार वेळ मागत आहे. सात महिन्यांपासून सरकार वेळच मागत असेल, तर मराठा समाज थांबू शकत नाही. आता आरक्षण घेऊनच आंतरवालीला माघारी परतणार आहे. अन्यथा मरायलाही मी भीत नाही. इथून पुढे मराठा आरक्षणाचा संघर्ष होऊ नये, म्हणूनच हा लढा आहे.”
हेही वाचा : “मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घ्यावं, सरकार…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन
“…तर तुमच्याविरोधात रोषपूर्ण वातावरण होईल”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा मराठ्यांनी मानसन्मान केला आहे. सरकारला सात महिन्यांचा वेळ दिला आहे. मुंबईला जाईपर्यंत सरकारला वेळ आहे. नंतर वेळ देणार नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मनापासून लक्ष घातलं पाहिजे. बाकीचे शब्दप्रयोग केले, तर तुमच्याविरोधात रोषपूर्ण वातावरण होईल. शासकीय नोंदी आढळल्या असून मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्यावं. बाकीचे प्रयत्न करायला गेल्यास, तर त्याचे दूरगामी वाईट परिणाम होतील,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.
हेही वाचा : “सरकार म्हणून माझी भूमिका संपली, मी आता…”, बच्चू कडूंचं विधान
“मी भीत नाही, कारण…”
“मला काही त्रास झाला, तर वर्षानुवर्षे आंदोलन बंद करणार नाही, असा शब्द मराठा समाजानं दिला आहे. त्यामुळे मी भीत नाही. कारण, माझ्यापाठीमागे मराठा समाज आहे,” असंही जरांगे-पाटलांनी सांगितलं.