Manoj Jarange Patil on Dhananjay Munde: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील उर्वरित आरोपी लवकर पकडावेत आणि सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी आज परभणी जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मराठ आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून सरकार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख तपासाचा पाठपुरावा करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना धमकविण्यात आले होते. याची कुणकुण लागल्यानंतर जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
मनोज जरांगे पाटील भाषणात म्हणाले की, धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात धमकविण्यात आले, अशी माहिती आम्हाला मिळाली. मी कुणाचेही नाव घेऊन उगाच बोलत नाही. पण यापुढे संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या केसाला जरी धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावरही फिरू देणार नाही. आमचा एक भाऊ गेला, तो आम्ही सहन केला. आतापर्यंत आम्ही कुणाचेही नाव घेतले नाही. पण यापुढे देशमुख कुटुंबियांना जर त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, “आम्हाला माज किंवा मस्ती नाही. पण आमची मुले जर रस्त्यावर येणार असतील तर आमच्यापुढे आता पर्याय नाही. तुम्ही लोकांना मारून आरोपींना घरात लपवून ठेवत असाल तर हे कसे काय सहन करायचे. सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? याचा अर्थ तुमच्या सरकारमधील मंत्री आरोपींना सांभाळत होते. या हत्येमधील आरोपी आणि खंडणीमध्ये पकडलेल्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहीजे. त्यांना आतापर्यंत कुणी सांभाळले, त्यांना सहआरोपी केले पाहीजे.”
आम्ही संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागायला पुढे आलो तर आम्ही जातीयवादी होतो आणि तुम्ही आरोपींना सांभाळता, मग तुम्ही कोण होता. संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केली, तो जातीयवाद नाही का? सरकार आणि इतरांना काय म्हणायचे असेल तर ते म्हणू द्या. पण समाज म्हणून आपल्याला लढावे लागेल.
© IE Online Media Services (P) Ltd