बीडमधील नांदूरघाट गावात बुधवारी (१५ मे) रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या दगडफेकीच्या घटनेत अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दुपारी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट घेतली, तसेच त्यांची विचारपूस केली. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. तसेच हल्लेखोर, हल्लेखोरांना पाठिशी घालणारे नेते आणि सत्ताधाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मलादेखील धमक्या दिल्या जात आहेत. माझ्याविरोधात समाजमाध्यमांवर पोस्ट लिहायला सांगितलं जात आहे. मात्र मी या सगळ्यांना घाबरणार नाही. उलट माझा आरक्षणासाठीचा लढा आणखी तीव्र करणार आहे.”
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “ते लोक माझ्यावरही हल्ले करण्याची योजना आखत आहेत. मला धमक्या दिल्या जात आहेत. मला म्हणतात, की बीडला येऊ नको. मात्र मी त्यांची गुंडगिरी सहन करणार नाही. मला त्या कार्यकर्त्यांना सांगायचं आह की तुम्ही मला धमकी देऊ शकता. मात्र तुमच्या नेत्यांना देखील महाराष्ट्रात फिरायचं आहे हे लक्षात ठेवा. त्या दोन्ही बहीण-भावाला (राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे) मी सांगेन की राज्यात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवा.”
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “तुम्ही लोक (मुंडे बहीण-भाऊ) मला धमक्या देताय, तुमचे कार्यकर्ते मला धमक्या देत आहेत. पण तुम्हाला देखील महाराष्ट्रात फिरायचं आहे हे लक्षात ठेवा. मला धक्का जरी लागला तरी लक्षात ठेवा… जी गोळी माझ्या अंगाला चाटून जाईल ती जात**** माझ्यावर कोणी हल्ला केला तर माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला खंबीर आहे. त्यामुळे मी देखील मागे हटणार नाही. मी मेलो तरी मागे हटणार नाही. मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय, मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही.”
हे ही वाचा >> “…तर मी मोदींसाठी धावून जाईन”, पंतप्रधानांच्या हाकेला उद्धव ठाकरेंची साद? म्हणाले, “त्यांच्यासाठी…”
मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे म्हणाले, “काही लोकांना कळून चुकलंय की हा माणूस (मनोज जरांगे) मराठ्यांना, दलितांना, मुस्लिम बांधवांना, १२ बलुतेदारांना १०० टक्के न्याय देऊ शकतो. त्यांना माहिती आहे की हा माणूस त्यांना सत्तेतून उतरवू शकतो, तसेच त्यांच्या हातात सत्तादेखील देऊ शकतो. हे त्यांना कळलंय म्हणून आता ते माझ्या मागे लागले आहे. म्हणूनच हे हल्ले होतात, या सगळ्याला मराठ्यांचे नेते देखील कारणीभूत आहेत.”