मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभे करण्याबाबत मराठा आंदोलक विचार करत होते. परंतु, मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केल्यास मराठा मतं फुटतील. त्यामुळे एका जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याचा पर्याय ठेवा असं जरांगे यांनी बैठकीत सांगितलं. यासह राज्य आणि केंद्र सरकारसमोर अधिक तीव्रपणे आपल्या मागण्या मांडण्यासाठी मराठा आंदोलकांनी वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत. सध्या तरी या योजना गुलदस्त्यात आहेत. परंतु, आम्हाला हलक्यात घेतल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज जरांगे पाटील सर्वपक्षीय नेत्यांना उद्देशून म्हणाले, राजकारणात मला हलक्यात घेऊ नका. मला मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं आहे. या आंदोलनात माझा काही स्वार्थ नाही. त्यामुळे मी सरकारला विनंती करून सांगतो, समाजाच्या मागण्या मान्य करा. मला या आंदोलनातून काही व्हायचं नाही आणि मी होणारही नाही. मी समाजाला शब्द दिला आहे आणि मी शब्द दिला म्हणजे दिला.. येत्या ३० मार्चपर्यंत योग्य निर्णय घ्या. मराठ्यांची भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय आम्ही उमेदवार निवडणार नाही, तसेच कोणाला पाठिंबादेखील देणार नाही. ३० तारखेपर्यंत समाजाच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा त्यानंतर आम्ही कोणालाही जुमानणार नाही. आम्ही आमच्यात जे निर्णय घेतलेत, जे काही ठरलंय, त्यानुसार धडाधड कामं सुरू करणार, निर्णय घेणार. कारण आम्ही आमचं ठरवलंय. मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना सांगितलं होतं, की आंदोलनावेळी तुम्ही मला हलक्यात घेतलं होतं. परंतु, आंदोलनावेळी तुम्ही मला हलक्यात घेतलंत तर तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील.

हे ही वाचा >> “उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला असता तर..”, ठाकरे गटाच्या यादीवर काँग्रेसची तीव्र नाराजी

मराठा आंदोलकांच्या बैठकीत मनोज जरांगे काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज भरणार होते. परंतु, ते अडचणीचं झालं असतं. मराठा समाजाला त्यांची शक्ती दाखवायची असेल तर उमेदवारही तुम्हीच द्या. फॉर्मही तुम्हीच ठरवा. पुढचा निर्णय ३० तारखेला जाहीर करु. मी राजकारणात उतरणार नाही. कारण तो माझा मार्ग नाही. कुणाच्या पक्षाला निवडा किंवा भाजपाला पाडा हे काही मला मान्य नाही. राजकीय शक्ती दाखवायची असेल, त्यांचं मतांमध्ये रुपांतर करायचं असेल तर हजार आणि दहा हजार फॉर्म भरु नका. एक उमेदवार द्या आणि त्याला निवडून आणा म्हणजे आपली ताकद दिसेल. मी राजकारणात जाणार नाही. निवडणुकीला उभा राहणार नाही. पण मराठा व्होट बँक काय आहे ती ताकद इथल्या प्रस्थापितांना दाखवून देणार”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil warns shinde fadnavis says dont underestimate me in politics asc
Show comments