मराठा आरक्षणासाठी गेल्या १३ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशात बदल करण्याची मागणी केली आहे. अध्यादेशात अपेक्षित बदल केला जात नाही तोवर आमरण उपोषण सुरूच राहील अशी त्यांची भूमिका आहे. मराठवाड्यातील ज्या लोकांच्या वंशावळीत कुणबी असा उल्लेख असेल, त्यांना कुणबी मराठा म्हणून जात प्रमाणपत्र दिलं जाईल, असं अध्यादेशात नमूद करण्यात आलं आहे. परंतु, आपल्याकडे वंशावळीचे कोणतेही दस्तऐवज नसून महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र दिलं जावं, असा बदल अध्यादेशात करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता खालावू लागली आहे. तर शासन मराठा आरक्षणप्रश्नी आपल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आहे. जरांगे-पाटील म्हणाले, कुठलाही पक्ष असो, सत्ताधारी आसो अथवा विरोधी पक्ष असो, या सगळ्यांनी किमान यावेळी एकत्र यावं आणि आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचे मायबाप व्हावं.
हे ही वाचा >> “उद्धव ठाकरेंचं सरकार पडत होतं त्याच वेळी…”, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
मनोज जरांगे पाटील म्हणाले, सर्व पक्षातील नेत्यांनी आमच्या पोरांचे पालक बना आणि आशीर्वादरुपी त्यांच्या डोक्यावर एकमताने हात ठेवा. मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढा असं माझं कळकळीचं आवाहन आहे. यासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आमच्या विनंतीचा मान राखा. आम्ही मराठ्याची लेकरं तुमच्या कोणत्याही पक्षाचा द्वेष करत नाही. सामान्य कुटुंबातील पोरांना फक्त एकच पाहिजे. आरक्षण द्या, त्यातच आमचं भविष्य गुंतलंय.