जालना : मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मध्यस्थी केली. परंतु आरक्षणाचा आदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, असे सांगून जरांगे पाटील यांनी त्यांना आणखी चार दिवसांची मुदत देऊन उपोषण सुरूच राहील, असे सांगितले.
जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा मंगळवारी आठवा दिवस होता. शिष्टमंडळ येण्यापूर्वी सकाळी शिवसेनेचे (शिंदे) अर्जुन खोतकर यांनी जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर सायंकाळी गिरीश महाजन, संदीपान भूमरे आणि अतुल सावे या तीन मंत्र्यांसह माजी राज्यमंत्री खोतकर यांनी उपोषणाच्या ठिकाणी जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा केली. स्थानिक आमदार राजेश टोपे यांचीही उपस्थिती यावेळी होती.
हेही वाचा >>>“मी जगलो तर तुमचा, अन् मेलो तर…”, मनोज जरांगे पाटलांचा मराठा आंदोलकांना संदेश
जरांगे-पाटील यांच्याशी चर्चेनंतर शिष्टमंडळाने बाजूला जाऊन मुख्यमंत्र्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर जरांगे-पाटील यांनी सांगितले की, शिष्टमंडळ मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बुधवारी पुन्हा चर्चेसाठी येणार आहेत. शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर जरांगे-पाटील म्हणाले, दोन दिवसांत मराठा आरक्षणाचा आदेश आणला नाही तर उपोषण सुरुच राहणार असल्याचे आपण परवा म्हणालो होतो. या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय आपण घेतलेला नाही. शासनास आदेशासाठी आपण आणखी चार दिवस मुदत देत असून तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही.
हेही वाचा >>>“माझी अत्यंयात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या…”, जरांगे पाटलांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
महिनाभराचा वेळ द्या-महाजन
यावेळी उपस्थितांसमोर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, शासनाचा आदेश काढण्यासाठी महिनाभराचा वेळ द्या. आदेशाच्या विरुद्ध कुणी न्यायालयातून स्थगिती मिळू शकेल असे काम आम्हास करावयाचे नाही. मागणीबाबत सरकार १०० टक्के सकारात्मक आहे. तोडग्यासाठी वेळेची गरज आहे. १५-२० दिवसांतही काम होऊ शकेल. आपण उपोषण सोडा, दोन दिवस आराम करा आणि मुंबईत येऊन बसा म्हणजे १५ दिवसांत गोड बातमी मिळेल. आपण ३० वर्षांपासून आमदार आहोत. उपोषणाच्या ठिकाणी एवढे सर्वपक्षीय नेते आल्याचे आपण पाहिले नाही. प्रकृतीची काळजी घ्या. तत्पूर्वी शिष्टमंडळाशी चर्चा करताना जरांगे-पाटील म्हणाले, एक महिन्यासाठी वेळ कशाला हवा? मराठवाडय़ातील मराठा समाजास सरसकट ओबीसीमध्ये घ्या. ओबीसीच्या यादीत आम्ही ८३ व्या क्रमांकावर आहोत. आम्ही आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या आतच आहोत. तुमच्या विनंतीला मान देऊन पाणी पितो, सलाईन लावून घेतो, परंतु उपोषण आणखी चार दिवस वाढवतो. चर्चेच्या वेळी भुमरे म्हणाले की, महिनाभरात आरक्षण मिळाले नाही तर आम्ही जबाबदार राहू.