Manoj Jarange Patil Hunger Strike for Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकादा बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी आज (२६ नोव्हेंबर) बीड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जाहीर केलं की “सरकार स्थापन झाल्यावर मी तारीख जाहीर करेन. त्या तारखेपासून मी आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहे”. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं की “आपण आपली आरक्षणाची लढाई आता तीव्र करू, उपोषणाची तारीख जाहीर केल्यानंतर आंतरवालीला या. आपण उपोषणाला बसू. सरकार आरक्षण देत नाही तोवर लढाई लढू”.
मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आवाहन करत म्हणाले, “तुम्ही वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान केलं असेल, तुम्ही ज्यांना मतदान केलं ते उमेदवार निवडूनही आले असतील. त्या आमदारांशी आरक्षणासाठी भांडा. तो आमदार भाजपाचा असेल, काँग्रेसचा असेल, महाविकास आघाडी किंवा महायुतीचा असेल, मराठ्यांनी आता एकजूट करून त्या आमदारांना आरक्षणासाठी मदत करण्याचं आवाहन करा. आपल्याला आरक्षण मिळवावंच लागेल. त्यासाठी सर्व मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक बेमुदत उपोषणाला बसायचं आहे. सरकार स्थापन झालं की मी प्रसारमाध्यमांद्वारे उपोषणाची तारीख सांगेन. त्या तारखेला अंतरवाली सराटीला या. उपोषणाच्या तयारीला लागा. तत्पूर्वी तुमची शेतातील कामं उरकून घ्या. सरकार स्थापन झालं की मी उपोषणाची तारीख सांगणार आहे. प्रत्येक कुटुंबातील काही सदस्यांनी उपोषणासाठी या. काही सदस्यांनी घर आणि शेती सांभाळा. दहा ते पंधरा दिवस तुमचं काम बुडेल, मात्र त्याची तयारी ठेवा. आपण उपोषणाला बसू आणि आरक्षण मिळवू”
हे ही वाचा >> आज-उद्या शपथविधी होणार नाही! राष्ट्रवादीने सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी; मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाले..
मनोज जरांगेंचा एल्गार
दरम्यान, यावेळी मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आलं की तुम्ही किती दिवस उपोषणाला बसणार? त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “सरकार जोवर आम्हाला आरक्षण देत नाही तोवर मी उपोषण करत राहणार. आम्ही मरत नाही तोवर उपोषण करणार. मरेस्तोर उठायचं नाही असं मी सर्वांना सांगितलं आहे. मला बघायचंच आहे की हे सरकार आम्हाला आरक्षण कसं काय देत नाही”.
हे ही वाचा >> आज-उद्या शपथविधी होणार नाही! राष्ट्रवादीने सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी; मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाले..
मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन
जरांगे पाटील, मराठा समाजाला आवाहन करत म्हणाले, निवडणुकीचं, राजकारणाचं खुळ आता डोक्यातून काढून टाका. वेडेपणा करू नका. तुमचा नेता मंत्री झाला असेल, आमदार झाला असेल तर त्याच्या गुलालात नाचू नका. तो तुम्हाला नाचवेल. परंतु, तुमच्या मदतीला येणार नाही. तुमच्या लेकरांच्या मदतीला येणार नाही. तुमच्या लेकराला शाळा, महाविद्यालयात प्रवेश हवा असेल तर तिथे तो मदत करणार नाही. त्याला नोकरी लावून देणार नाही. आगामी काळात वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या भरत्या निघणार आहेत, त्यामुळे आरक्षणासाठी तुटून पडा.