मराठा समाजाला सगेसोयऱ्यांसह आरक्षण मिळण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला १३ जुलैपर्यंत आरक्षण देण्यासंदर्भात मुदत दिली आहे. आता मनोज जरांगे यांनी राज्यात आजपासून शांतता रॅली सुरु केली आहे. हिंगोलीतून या रॅलीची सुरुवात करण्यात आली आहे. आजपासून सुरु झालेली ही रॅली १३ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत. दरम्यान, आज मनोज जरांगे यांनी हिंगोली जिल्ह्यातील मराठा समाजाला संबोधित केलं. यावेळी मराठा समाजाला संबोधित करत असताना मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले होते. “सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय, पण मराठा समाजाला मी हात जोडून विनंती करतो. मला उघडं पडू देऊ नका”, असं म्हणत मनोज जरांगे भावूक झाले.
मनोज जरांगे काय म्हणाले?
“मी उघड्यावर पडलो तरी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मागे हटणार नाही. मराठा समाजाला मी मायबाप मानलं आहे. माझा मायबाप मराठा समाजच माझ्यासाठी सर्वकाही आहे. माझ्या समाजाने काहीही कमी पडू दिलेलं नाही. मराठा समजातील लोकांनीही मला दु:ख द्यायला नाही पाहिजे. माझी हात जोडून समाजाला विनंती आहे, मायबापाहो मी समजासाठी लढतोय. माझा समाज मोठा होईल म्हणून तुम्ही पाठिशी राहा”, असं भावनिक आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
हेही वाचा : “मी डेफिनेटली खासदार होणार, आता बारामती…”, परभणीतील पराभवानंतर जानकरांनी सांगितली पुढची योजना
“मराठा समाजाला मोठं करण्यासाठी निघालो आहे. कारण माझ्या समाजाने खूप वेदना सहन केल्या आहेत. माझ्या मायबाप समाजाचे विद्यार्थी शिकवून खूप मोठं व्हावेत, असं स्वप्न बघितलं आहे. पण आरक्षणाच्या अडचणीमुळे आपल्या समाजातील तरुण मोठं होत नाहीत. आता सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील मराठा समाजासह महाराष्ट्रातील मराठा समाजापुढे मी हात जोडून विनंती करतो. मला उघडं पडू देऊ नका”, असं म्हणत मनोज जरांगे हे भाषण करताना भावूक झाले.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, “आता त्यांनी ठरवलं आहे की, मला उघडं पाडायचं. मात्र, मनोज जरांगे जर लांब गेला तर मराठा समाजाला एवढा निष्ठावान कोणीही मिळू शकणार नाही. त्यामुळे मला बदनाम कराचं ठरवलं आहे. पण तुम्ही मला उघडं पडू देऊ नका. मला तुमच्या पाटबळाची आणि आशीर्वादाची गरज आहे”, असं म्हणत मनोज जरांगे यांना भाषण करताना अश्रू अनावर झाले.