मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. १० दिवसांच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यापेक्षा जास्त दिवस वाट पाहण्याची आमची तयारी नाही. आता मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. ते जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जाहीरसभेत बोलत होते. त्यांच्या सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य लोकांनी उपस्थिती लावली आहे.
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले, “तुमचा मुलगा म्हणून सांगतोय, मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय हा मनोज जरांगे एक इंचही मागे हटणार नाही. आम्ही सरकारला शेवटची विनंती करतो. मराठा समाजासाठी गठीत केलेल्या समितीचं काम आता बंद करा. तुमचं आणि आमचं ठरलं होतं. चार दिवसांत कायदा पारित होणार नाही, आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या, आधार घेऊन कायदा पारित करतो, असं आश्वासन तुम्ही दिलं होतं. आता पाच हजार पानांचा पुरावा समितीला मिळाला आहे. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा.”
हेही वाचा- “पाच हजार पुरावे पुरेसे नाहीत मग आता काय ट्रकभर…”, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सवाल
“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला आणि राज्य सरकारला कोट्यवधी मराठा समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करतो, या राज्यातील सर्वात मोठा समाज असलेल्या मराठा समाजाची विनाकारण हालअपेष्टा करू नका. या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राने आणि राज्याने तातडीने निर्णय घ्यावा. सरकारने मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याचा जाहीर निर्णय करावा. दहा दिवसांपेक्षा जास्त काळ वाट पाहण्याची आता आमची तयारी नाही,” असंही मनोज जरांगे म्हणाले.
“केंद्राला आणि राज्याला सांगतो, आज मराठ्यांचं ‘आग्या मोहोळ’ शांत आहे, हे ‘आग्या मोहोळ’ एकदा उठलं, तर मग हे आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही. हा गोरगरीब मराठा समाज शेतीवर कष्ट करून देशाला अन्नधान्य पुरवतो. त्यांची लेकरं आरक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे. माझंही लेकरू नोकरीला लागलं पाहिजे, हे गोरगरीब मराठ्याचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सरकारने तातडीने मराठा आरक्षण जाहीर करावं”, असंही मनोज जरांगे म्हणाले.