Manoj Jarange : मराठा आरक्षणाची मागणी सातत्याने लावून धरणारे मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. सरकारने अधिवेशन काळात आरक्षण द्यावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात, सरकार म्हणून ते मागण्या मान्य करतील अशी अपेक्षा आहे असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले आहेत. दरम्यान त्यांना छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेलं नाही याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
“सरकारला माझी विनंती आहे की अधिवेशन सुरु झालं आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं कारण आम्ही पूर्वीपासून ओबीसी आहोत. आमच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत. तसंच तिन्ही गॅझेट लागू करावेत, शिंदे समितीचं काम पुन्हा सुरु करावं, सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी या आमच्या आठ ते दहा मागण्या आहेत त्या मागण्या सरकारने मान्य कराव्या. आम्हाला आशा आहे की सरकार हे करेल. मी राजकारणाच्या विषयात पडणार नाही. राजकारण किंवा इतर जे काही विषय आहेत ते त्यांचे वैयक्तिक विषय आहेत. आरक्षणाच्या बाबतीत मी काही कुणाला सोडणार नाही. बाकी राजकीय विषयात ढवळाढवळ करणार नाही. आम्ही तारीख जाहीर करणार आहोत. त्या तारखेला महाराष्ट्रातले सगळे मराठे ताकदीने उपस्थित राहतील.” असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी म्हटलं आहे. तसंच छगन भुजबळ यांच्यावरही भाष्य केलं आहे.
छगन भुजबळांबाबत काय म्हणाले मनोज जरांगे?
छगन भुजबळ यांना का डावललं हे मला माहीत नाही. तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे. त्याला का दिलं होतं ते पण माहीत नाही. आता का दिलं नाही ते पण माहीत नाही. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांचं आम्हाला काही घेणंदेणं नाही. गोरगरीबांना अगदी ओबीसींनाही त्यांनी काही खाऊ दिलेलं नाही. पण तो राजकीय विषय आहे त्यात मी काहीही बोलणार नाही. मला त्याची काही गरज वाटत नाही. असं म्हणत मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange ) छगन भुजबळांबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे आम्हाला आता अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळेल आमच्या मागण्या मान्य केल्या जातील. जर नाही केलं तरीही आम्ही सज्ज आहोत. मंगळवारी आम्ही तारीख जाहीर करणार आहोत. सकाळी ११ च्या सुमारास आम्ही बेमुदत उपोषणाची तारीख आम्ही जाहीर करणार आहोत. ज्यांना इच्छा असेल त्यांनी बसावं. कुणीही उपोषणाला बसलं नाही तरीही मी बसणार आहे असंही मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange ) म्हटलं आहे.