अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भिवंडी येथील ओबीसी मेळाव्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. भुजबळांनी जरांगेंचा एकेरी उल्लेख करत त्यांची तुलना मद्यपींशी केली. दारू पिऊन मनोज जरांगेंच्या किडन्या खराब झाल्या आहेत. आधीच माकड त्यात बेवडा प्यायलेला, अशा अर्थाच्या म्हणीचा वापर करत भुजबळांनी टीकास्र सोडलं. यावर मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जन्मापासून आतापर्यंत माझ्या शरीराला दारुचा स्पर्श जरी झाला असेल तर मी जिवंत समाधी घेतो अन्यथा भुजबळांनी जिवंत समाधी घ्यावी, असं आव्हान जरांगे पाटील यांनी दिलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, “यामुळेच मी त्याला (छगन भुजबळ) येडपट म्हणतो. खास येडपट म्हणता. तो येवल्यात बसून सासुच्या घरचं खातो, म्हणूनच मी त्याला येडपट म्हणतो. मी त्याला जाहीर आव्हान करतो की, माझी नार्को टेस्ट करा. जन्मापासून आतापर्यंत माझ्या अंगाला दारूचा स्पर्श जरी झाला असेल तर मी जिवंत समाधी घेतो. नाहीतर त्यांनी तरी जिवंत समाधी घ्यावी. हे मी अत्यंत जबाबदारीने बोलत आहे. त्यामुळे तू काहीही बोलू नको, मापात राहा.”
हेही वाचा- “आधीच माकड आणि त्यात बेवडा…”, भुजबळांची मनोज जरांगेंवर बोचरी टीका
छगन भुजबळांना उद्देशून मनोज जरांगे पुढे म्हणाले, “तो प्रचंड जातीवादी आहे. तो मुर्खांचा मुकादम आहे. तो महामूर्ख माणूस आहे. त्यामुळेच मी त्याला येडपट म्हणतो. माझ्या शरीराला जन्मापासून दारुचा डागही नाही. हे शरीर जनतेसाठी लढून असं झालं आहे. तुझ्यासारखं लोकांचं रक्त पिऊन शरीर वाढलं नाही आणि माकड काय करू शकतं? ते जरा रावणाला विचार. तुझी लंकाही जळेल, जरा नीट राहा.”