सांंगली : विधानसभा निवडणुकीत पाडायचे, की उभे करायचे याचा निर्णय २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीमध्ये होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार असून, आता मराठा समाजाने राजकीय पक्ष, नेता याच्या मागे न लागता मुला-बाळांच्या भवितव्यासाठी आरक्षणाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गुरुवारी केले.
जरांगे यांच्या शांतता फेरीचे आज, गुरुवारी सांगलीत आगमन झाले. मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुचाकी फेरीने विश्रामबाग येथे आगमन झाले. यानंतर पायी शांतता फेरी राम मंदिर चौकापर्यंत काढण्यात आली. त्यानंतर जरांगे यांची जाहीर सभा झाली.
हेही वाचा : Manoj Jarange: एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने वाटोळे करायचे हीच सरकारची पद्धत- मनोज जरांगे-पाटील
या वेळी जरांगे म्हणाले, की माझा लढा हा मराठा समाजासाठी आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे, ते पोराबाळांच्या भविष्यासाठी. आता मागे हटणार नाही. मला समाजाच्या लढ्यापासून परावृत्त करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असून, माझ्यावर वेगवेगळ्या लोकांच्या टोळ्या सोडण्यात आल्या आहेत. छगन भुजबळ, प्रवीण दरेकर, राणे यांच्यासारख्यांना माझ्यावर टीका करण्यास सांगण्यात आले आहे. माझ्या मागे एसआयटी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला असून, गेवराईला नोटीस पाठविण्यात आल्याची माहितीही आज मिळाली. मात्र, मी अशा कृत्यांना भीत नाही.
हेही वाचा : CM Eknath Shinde : ‘रस्ते दुरुस्तीच्या कामात हयगय नको’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अधिकऱ्यांना सूचना
येत्या विधानसभा निवडणुकीत पाडायचे की उभे करायचे, याचा निर्णय दि. २९ ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी येथे होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल. मात्र, जर उमेदवार उभा करण्याचा निर्णय झाला, तर मिळेल त्या उमेदवाराच्या पाठीशी समाज म्हणून ताकतीने उभे राहा. आपली सत्ता आली, तर सर्व समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवू. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये संपवू, असे सांगणारे दहा वर्षे हा प्रश्न सोडवू शकले नाहीत. यामुळे राजकीय पक्ष, नेता यापेक्षा आपला समाज मोठा हे प्रत्येकाने ओळखून यापुढे वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी केले.
© The Indian Express (P) Ltd