मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, असं वक्तव्य राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. भुजबळ शनिवारी बीड येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांनाही सुनावलं. भुजबळ म्हणाले, जे नेते याप्रकरणी शांत आहेत त्यांच्याविरोधात मला काही बोलायचं नाही. परंतु, आमच्याविरोधात त्यांना (मनोज जरांगे यांना) शक्ती देणाऱ्यांना आम्ही कधीच विसरणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. सध्या बाहेर जे काही चाललंय त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल.
छगन भुजबळ म्हणाले, ते (मनोज जरांगे) राष्ट्रीय नेत्यांना सांगत आहेत की आमच्या मुंबईतील मोर्चाच्या पाठिशी उभे राहा आणि ते नेतेही म्हणतात आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. मला त्या नेत्यांना सांगायचं आहे, तुम्ही कोणाच्याही पाठिशी उभे राहा. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तुम्ही मराठा समाजाच्या पाठिशी उभे असाल तर त्याला माझी काही हरकत नाही. परंतु, ते (मनोज जरांगे) म्हणतात की ओबीसीतूनच आरक्षण घेणार. त्यांची अशी भूमिका असेल तर मला त्यांना स्पष्ट सांगायचं आहे की, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, ओबीसीतून मराठा सामाजाला आरक्षण मिळणार नाही.
मराठा आंदोलनाच्या काळात बीडमधील काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळेच भुजबळ यांनी बीडमध्ये हा एल्गार मेळावा घेतला. यावेळी भुजबळ म्हणाले, “छत्रपतींचं नाव घेऊन बीडमध्ये जाळपोळ करण्यात आली.” भुजबळांच्या या आरोपावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे भुजबळांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, त्याला हे कोणी सांगितलं? मला वाटतं त्याच्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही, कारण त्याला बुद्धी नाही. त्याचे पाहुणे आले आणि त्यांनी त्याचं हॉटेल जाळलं. आता तो मराठ्यांवर आरोप करतोय, छतपतींचं नाव घेतोय.
हे ही वाचा >> “बेटा छोड दे हथियारों की बात, वरना सब…”, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना इशारा
मनोज जरांगे पाटील म्हणाले, भुजबळांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव खराब करायचं आहे. त्यांच्या मनात पहिल्यापासूनच मराठ्यांविषयी पाप आहे, विष आहे, जे आता या वक्तव्यांमधून बाहेर येत आहे. यापूर्वी राजकीय स्वर्थासाठी तुम्ही महाराजांचा वापर केलात. आता तुमचं पोट भरलंय, म्हणून त्यांचं नाव खराब करत आहात. भुजबळ हा वेडा माणूस आहे. याआधीही त्याने महापुरुषांची नावं घेऊन त्यांच्या जाती काढल्या होत्या. हा मंत्रिमंडळाला आणि राज्याला लागलेला कलंक आहे. याला मंत्रिमंडळात ठेवू नये. परंतु, त्याला हे लोक का सांभाळत आहेत तेच कळत नाही. त्यांनी भुजबळाचा उदो उदो का चालवलाय ते माहिती नाही. त्याचे लाड का पुरवले जातायत तेच कळत नाही. परंतु, त्याचे लाड पुरवणाऱ्यांना हे प्रकरण जड जाणार आहे.