Manoj Jarange : ९ डिसेंबरला बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली. आवादा कंपनीच्या खंडणीच्या गुन्ह्यातून ही महाराष्ट्राची मान खाली जाणारी हत्या करण्यात आली. त्या घटनेचं क्रौर्य काय आहे ते समोर आलेल्या फोटोंवरुन समजलं आहेच. दरम्यान मनोज जरांगेंनी या प्रकरणी भाष्य केलं आहे. धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री वाचवत आहेत असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

४ मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे आरोपी अटक झाले त्यातला कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. तर वाल्मिक कराडच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. तसंच मकोकाही लावण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन मागच्या सोमवारी सुरु झालं. त्याच दिवशी रात्री संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले. सोशल मीडियावर ते व्हायरल झाले. ज्यानंतर दुसऱ्याच दिवसी म्हणजेच ४ मार्चला धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे त्यामुळे या प्रकरणाची नैतिक जबाबदारी धनंजय मुंडेंनी स्वीकारुन राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून होत होती. तो राजीनामा ४ मार्चला झाला आहे. दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कलम ३०२ लागू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाला पूर्णविराम दिल्याचा आरोप केला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणूनबुजून यांनी विषयाला पूर्णविराम दिला आहे. तपास यंत्रणा किंवा पोलिसांना सांगून हे सगळं मिटवण्यात आलं. सीआयडी किंवा एसआयटी यांच्याकडे किंवा स्थानिक पोलिसांकडे धनंजय मुंडे त्या गुन्ह्यात असल्याचे १०० टक्के पुरावे आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडेंना मुख्य आरोपी होऊ देत नाहीत. ३०२ चं कलम लावत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेसारख्या गुंडाला वाचवू नये. कारण एक दिवस तो विषारी साप तुमच्यासमोर उभा राहिल. त्यावेळी पश्चात्तापाचा हात कपाळावर मारुन घेणारे देवेंद्र फडणवीस पहिले असतील असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर धनंजय मुंडे उद्या तुरुंगात-मनोज जरांगे

खंडणी मागायला जा किंवा खून करा अशीच बैठक झालेली आहे. वाल्मिक कराडच्या कार्यालयातच ही बैठक झाली आहे. आधी कट रचला गेला आहे. खुनाच्या कटाचा आरोपही धनंजय मुंडेंवर लागला पाहिजे. मला हे वाटतं आहे की तपास यंत्रणांकडे पुरावे आहेत. फक्त देवेंद्र फडणवीस यांनी थांबायला सांगितलं आहे. त्यामुळे तपास यंत्रणा हतबल झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जर मनावर घेतलं तर उद्या सकाळी धनंजय मुंडे ३०२ च्या कलमांत तुरुंगात जातील. देवेंद्र फडणवीस यांनी गुंडाला वाचवू नये. कारण तुमच्या पक्षापुढे आणि तुमच्यापुढे धनंजय मुंडे संकट म्हणून उभा असेल, त्यामुळे ही मागणी आहे की धनंजय मुंडेला वाचवू नका. गोर गरीबाची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

Story img Loader