मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी लढा उभा केला आहे. त्यांच्या शांतता रॅलीला शनिवारपासून सुरुवात झाली. हिंगोलीत झालेल्या भाषणात त्यांनी सरकारवर टीका केली आहे. तर काही वेळापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छगन भुजबळ हे सरकारचे मुकादम आहेत अशी टीका केली. लक्ष्मण हाकेंना आम्ही विरोधक मानत नाही असंही जरांगेंनी म्हटलं आहे. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केल्यानंतर ओबीसींमधूनच आरक्षण हवं ही भूमिका घेतली होती. ज्या भूमिकेला छगन भुजबळांनी विरोध केला. त्यानंतर या दोघांमध्ये खडाजंगीही पाहण्यास मिळाली होती. आता पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर टीका केली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
“लक्ष्मण हाकेंना आम्ही विरोधक मानत नाही. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये हे जे काही घडवलं जातं आहे त्यामागे छगन भुजबळ आहेत. छगन भुजबळ जे करत आहेत ते सामान्य लोकांना पटलेलं नाही, त्यांना ते मान्य नाही. आमच्या नोंदी सापडलेल्या असताना नाही म्हणणं, मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असताना आपला नेता मराठ्यांना का आरक्षण द्यायचं नाही म्हणतो असं सामान्य ओबीसी लोकांना वाटतंय म्हणून ओबीसी आंदोलनात सहभागी होत आहेत.” असा दावा मनोज जरांगेंनी केला.
हे पण वाचा- मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका, “बेट्या तुझा टांगा पलटवतोच, तू आमच्यात काड्या…”
देव आला तरीही…
“छगन भुजबळांनी १०-२० लोक हाताशी धरले आणि त्यांना ते बोलायला लावत आहेत. आमच्या आरक्षणामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. देव जरी आला तरी धक्का लागत नाही. तुम्ही ST आरक्षणासाठी लढा, तुमच्या पाठीशी मनोज जरांगे आधी उभा राहील. कुणबी मराठा एकच आहे त्यामुळे ओबीसीतून आरक्षण देण्याची पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे” असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. तसंच छगन भुजबळ सरकारचे मुकादम असल्याचीही टीका केली.
हे पण वाचा- “इतक्या जोमाने एसटी आरक्षणासाठी लढले असते, तर…”; मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना टोला!
भुजबळ सरकारचे मुकादम
छगन भुजबळ हे सरकारचे मुकादम आहेत, तेच सगळं काही घडवून आणत आहेत. कुणबी-मराठा एकच आहेत. त्यांनी बाकीच्या जाती पोटजाती म्हणून घातल्या आहेत. भुजबळांना सरकार सांगतं म्हणून ते त्रास देतात. मराठा आरक्षणावरुन काहींचं पोट दुखतं त्यात आमचेही काही लोक आहेत. भुजबळही त्यापैकीच एक आहेत अशीही टीका मनोज जरांगेंनी केली. विधानसभेसाठी २८८ उमेदवार उभे करायचे ठरले तर सगळ्या जाती धर्माचे लोक उभे करणार, सगळ्या जातीचे उभे राहू द्या. ओबीसींच्याच नाही मराठ्यांना त्रास देणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना देखील पाडा, मराठ्यांना त्रास व्हायला नको, अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली. २८८ निवडून द्यायचे की पाडायचे हे अजून ठरायचे आहे, असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.