महाराष्ट्रात जसा मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षणासाठीही लक्ष्मण हाकेंनी आंदोलन उभं केलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी लक्ष्मण हाकेंना उत्तर दिलं आहे. आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केली.
काय म्हणाले मनोज जरांगे?
“मराठा आणि कुणबी एकच आहेत. आम्ही आमचं हक्काचे आरक्षण मागतो आहे ते आम्हाला द्या. सगे सोयरे आरक्षण देऊन ते उडवण्याचा सरकारचा डाव आहे आणि ते उडवलं जातं आहे. सरकार आरक्षण देणार आणि तेच आरक्षण देणार आहे. आरक्षण देण्याच्या आधीच याचिका दाखल झाली होती. पुन्हा मराठ्यांना गोड बोलून डाव साधण्याचा हा डाव आहे. आरक्षण ओबीसीतून घेणार अन्यथा २८८ उभे करू नाहीतर २८८ जणांना पाडू. मराठ्यांचं आरक्षण टिकू न देण्याची तयारी गिरीश महाजन यांनी केली आहे.” असं मनोज जरांगेंनी म्हटलंय.
आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं
ज्याला मराठा राहायचं आहे तो मराठा म्हणून राहिल, कुणबी प्रमाणपत्र हवं असेल तर ते प्रमाणपत्र ते घेईल. हैदराबादचं गॅझेट लागू करा. सगळा अभ्यास वगैरे करुन जर म्हणत असतील की आरक्षण टिकणार नाही तर हा डाव आहे. असं असेल तर सरसकट आरक्षण द्या. मी जिवंत आहे तोपर्यंत ओबीसीतूनच आरक्षण घेणार. सगे सोयरेही उडवू देणार नाही आणि ही मागणीही सोडणार नाही. कितीही गोंधळ निर्माण केला तरीही चालेल. यांनी आता आंदोलन करायला लावलं आहे. कुणी आरक्षण करायला लावलं हे सगळ्यांना माहीत आहे. देवेंद्र फडणवीसांनी सांगायचं की आपण असं करायचं. मग त्यांच्याच पेंद्यासारख्या मित्राने सांगायचे की ते उडणार आहे. आम्ही काय कच्चे बसलो आहे का इथे? असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.
हे पण वाचा- ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर निराशा, सहा दिवसांत कमावले फक्त…
आम्ही ओबीसींना विरोधक मानत नाही
आम्ही ओबीसींना विरोधक मानत नाही. १३ जुलै पर्यंत आंदोलक म्हणून माझा विश्वास आहेच. कारण शिंदे-फडणवीस यांनी सांगितलं आहे आम्ही आरक्षण देणारही आणि टिकवणारही आहोत. आता जर आरक्षण दिलं नाही तर सुपडा साफ करणार हे स्पष्ट आहे. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. समाज जे म्हणेल तसंच मी वागणार १३ तारखेनंतर मी गप्प बसणार नाही. विधानसभेपर्यंत मराठा-ओबीसी वाद पेटत ठेवला तर तिथेही जिंकणार नाही. विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो आम्ही २८८ लोकांना पाडू. २० वर्षे आम्ही यांना रुळावर येऊ देणार नाही. करेक्ट कार्यक्रम करणार, आमचा खानदानी राजकारण कऱण्याचा धंदा नाही. पण खानदानी राजकारण करणाऱ्यांचा कार्यक्रम करणार असंही जरांगे म्हणाले.
ओबीसी मराठ्यांमध्ये काड्या टाकणारा तिकडे बसलाय
“लक्ष्मण हाकेंना आम्ही विरोधक मानत नाही. त्यांनी त्यांचं आंदोलन करावं. मी धनगर बांधव, एकाही ओबीसी बांधवांना बोललो नाही. आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही. पुढेही मानणार नाही. मफलर आडवा टाकून काड्या टाकणारा तिकडे बसला आहे. काडी टाकून देतो आणि बघतो मजा. आमचा त्यांच्यावर रोष नाही. तुमचा आमचा काही संबंध नाही असं ओबीसी समाजाला माझं सांगणं आहे.” असंही मनोज जरांगे म्हणाले आणि भुजबळांना टोला लगावला.