मराठा आरक्षणाबाबतची आपली मागणी मान्य न झाल्याने मनोज जरांगे अद्याप बेमुदत उपोषणावर ठाम आहेत. सुरुवातीला अन्न, पाण्याशिवाय उपोषणाला सुरुवात केलेल्या मनोज जरांगे यांनी प्रकृती खालावल्यावर नेते व समर्थकांच्या विनंतीवरून पाणी घेणयास सुरू केले. मात्र, अद्याप मराठा आरक्षणावर तोडगा न निघाल्याने जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे.
मनोज जरांगे म्हणाले, “सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची आता ही त्यांची दुसरी वेळ आहे. त्यांनी आम्हाला स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे की, ते महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण का देत नाहीत? त्यांना किती दिवस लागणार आहेत? सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण का दिलं जात नाहीये. देणार असतील तर किती किती दिवसात देणार आहेत?”
“आमदारांनी परत येऊ नये, त्यांनी सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडावं”
“सर्वपक्षीय बैठकीच्या निमित्ताने सर्वांना विनंती आहे की, त्यांनी मुंबई सोडू नये. विशेष अधिवेशन तातडीने बोलवायला लावा. त्या अधिवेशनात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाजात समावेश करा. यासाठी गोरगरीब मराठ्यांच्यावतीने मी हात जोडून विनंती आहे की, सर्व आमदारांनी परत येऊ नये. त्यांनी सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडावं. आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबवणार नाही,” असं स्पष्ट मत मनोज जरांगेंनी व्यक्त केलं.
हेही वाचा : मराठा आरक्षणावरून झालेल्या हिंसाचारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आंदोलनाला गालबोट…”
“मेसेज व्हायरल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, काय आवाहन कराल?”
“मेसेज व्हायरल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, काय आवाहन कराल?” या प्रश्नावर मनोज जरांगे म्हणाले, “मराठा समाजाचे तरुण शांततेत आंदोलन करत आहेत. हा संभ्रम सरकारी पक्षाचेच लोक निर्माण करत असावेत. बीड, केजचे साखळी उपोषणाला बसलेल्या आमच्या लोकांना पोलिसांनी विनाकारण उचलून नेलं. यावरून हे कळतं की, प्रशासन सरकारच्या पुढेपुढे करत आहे.”
“बीडचे पोलीस अधीक्षक मराठा आंदोलकांवर कसे अन्याय करतात ते पाहतो”
“हिंसाचार करणारे बाजूला राहिले आणि शांततेत आंदोलन करणाऱ्यांचं साखळी उपोषण बंद केलं जात आहे. जर त्यांना सोडलं नाही, तर बीडचे पोलीस अधीक्षक मराठा आंदोलकांवर कसे अन्याय करतात ते मी पाहतो. असं असलं तरी त्या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाली आहे,” अशी माहिती मनोज जरांगेंनी दिली.
हेही वाचा : “मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो की, तुम्ही नेट बंद करून…”; मनोज जरांगेंचं वक्तव्य, म्हणाले…
“…तर मी आज संध्याकाळपासून पाणी सोडणार”
“जर तातडीने अधिवेशन घेण्यावर व मराठा आरक्षण देण्यावर आज निर्णय घेतला नाही, तर मी आज संध्याकाळपासून पाणी सोडणार आहे,” असा इशाराही जरांगेंनी दिला.