Manoj Jarange मराठ्यांशी बेईमानी करायची नाही, तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे हे लक्षात ठेवा असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. मराठ्यांच्या मतांशिवाय कुणी सत्तेत येऊ शकत नाही हे विसरु नका असंही मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले. तसंच शपथविधी झाला की शुभेच्छा देऊ नाहीतर त्यांचं पुन्हा काहीतरी लांबलं तर आपल्या शुभेच्छा वाया जायच्या असाही टोला जरांगेंनी ( Manoj Jarange ) लगावला.
काय म्हणाले मनोज जरांगे?
“मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल, सत्ता आली, भरपूर बहुमत मिळालं म्हणून मराठ्यांशी बेईमानी करायची नाही. पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही. याँव करेन आणि त्याँव करेन असं चालणार नाही. मराठे कुणाच्या बापाला भीत नसतात. मराठा रस्त्यावर उतरला की तुमचं काही खरं नाही. गॅझेट लागू करायचे, मराठा आणि कुणबी एकच आहे. उगाच सत्ता आली म्हणून मस्ती येऊ द्यायची नाही. मराठे कुणाचीही मस्ती टिकू देत नाही तशीच मी पण टिकू देणार नाही.” असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी म्हटलं आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले मनोज जरांगे?
“लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आणले कुठून? आम्ही फक्त इतके हजार कोटी आणले हेच ऐकतोय. आता अटी घातल्या आहेत असं कळतंय म्हणजे योजना बंद करायची आहे का? हे आमचेच पैसे आम्हाला घेऊन दिले आहेत. अटी कशा आहेत ते काय माहीत नाही. शेतमालाला भाव देणार नाहीत, शेतकऱ्यांना मदत करत नाहीत उलट फक्त रस्ते तयार करत आहेत.” असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले. तसंच समृद्धीला तर नुसती चित्रंच आहेत. कांद्याला भाव हवा, कापसाला हवा, महागाई वाढली त्यावर काय करायचं? आपण मैदानात असतो तर सूपडा साफ केला असता. मात्र आरक्षण घेणार म्हणजे घेणारच. रक्तपात करेन, हल्ले करेन हे स्वप्न सरकारने सोडून द्यावं असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे, उपोषणाची तारीख लवकरच जाहीर करणार
आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे. माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला होता आणि धरला आहे. उपोषणाची तारीख आम्ही जाहीर करणार नाही. त्यांचं सरकार स्थापन होऊदे त्यानंतर आम्ही तारीख जाहीर करु. सगळ्या पक्षांमध्ये आमचा मराठा समाज आहे. सगळे मिळून आरक्षणाची लढाई लढणार आहोत. सगळ्या आमदारांना मराठे बोलायला लावणारे आहेत. जर नाही बोलले तर मतदान करणारेच त्या आमदाराला जाब विचारतील. सरकार स्थापन होऊ द्या मग उपोषण आंदोलनाची तारीख जाहीर करणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.