मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे. परंतु, सरकारकडून अद्याप काहीच हालचाली दिसत नाहीत. याप्रकरणी चर्चा करण्याकरता फेब्रुवारीत विशेष अधिवेशन भरवलं जाईल, असं हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. असं असतानाच बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत २० जानेवारीला आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं. २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर ते बेमुदत उपोषण करणार आहेत. यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
“सरकार अतिशय सकारात्मकतेने काम करतंय. मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम सुरू केलं आहे. शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे, तिसरा अहवालही अपेक्षित आहे. त्यात निजामकालीन नोंदी हैदराबादहून प्राप्त करून घेत आहोत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा >> “२० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण”, बीडमधून जरांगे-पाटलांची मोठी घोषणा
“राज्य सरकारची सकारात्मकता बघता असा निर्णय (उपोषणाचा) त्यांनी (जरांगेंनी) घेऊ नये. राज्य सरकार योग्य काम करतंय, तसा निर्णय ते घेणार आहेत. आम्ही पूर्ण शक्तीने काम करत आहोत. ओबीसी समाजाला त्रास, अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर सकारात्मक पद्धतीने कार्यवाही सुरू आहे”, असंही फडणवीस म्हणाले.
मनोज जरांगे काय म्हणाले होते?
“सरकारनं मराठ्यांना नोटीसा दिल्या आणि मुंबईत १८ जानेवारीपर्यंत १४४ कलम लागू केलं. त्यामुळे २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करण्यात येईल. २० जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आणि मला भेटण्यासाठी मराठे येतील. शांततेच्या आणि कायदेशीर मार्गानं आपण उपोषण करू. पण, कोण कुठं बसेल माहिती नाही. रोड मोकळी करून बसण्याची व्यवस्था करावी. नाहीतर आमच्या धोरणाने आम्ही बसू. मात्र, मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली, तर विराट समुदाय माघारी फिरणार नाही. आरक्षण घेऊनच माघारी फिरू,” असा इशारा जरांगे-पाटलांनी सरकारला दिला आहे.